‘पंतप्रधानपदावरून माझी हकालपट्टी करण्यात आली हा एक विनोद असून, मी चौथ्यांदा पाकिस्तानचा पंतप्रधान बनल्याशिवाय राहणार नाही’, असा विश्वास पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या पीठाने पनामा प्रकरणात शरीफ यांना संसदेशी अप्रामाणिकपणा केल्यामुळे अपात्र ठरवले होते व त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली. त्यानंतर त्यांनी शक्तिप्रदर्शनाचा अवलंब केला असून ठिकठिकाणी ते सभा घेत आहेत.

पाकिस्तानमधील गुजरावाला येथे त्यांनी सभा घेतली, त्या वेळी ते म्हणाले, की ‘ज्या न्यायाधीशांनी मला अपात्र ठरवले त्यांना भ्रष्टाचाराचे एकही उदाहरण दाखवता आले नाही, मग मला अपात्र ठरवण्याचे कारण काय होते. उद्या परत लोकच मला पंतप्रधानपदी बसवतील. त्यांनी कागदोपत्री मला दूर केले आहे. ते मला तुमच्या मनातून काढू शकणार नाहीत. मला ज्या पद्धतीने काढले तो विनोद मला मान्य नाही, हा विनोद तुम्हाला तरी पटतो का, तुम्ही एखाद्याला निवडून देता आणि दुसरे कुणीतरी त्याला काढून टाकते ही बाब तुम्ही कशी स्वीकारणार?’

‘मला का काढण्यात आले. मी कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार केला होता. मी निरपराध आहे. काही आर्थिक घोळ केलेला नाही. ज्यांनी मला अपात्र ठरवले त्यांनीच हे म्हटले आहे तर मग मला पंतप्रधानवरून का काढले असा सवाल त्यांनी केला. आता देश बदलण्याची वेळ आली आहे. तुमच्या मताचा आदर झाला पाहिजे. वीस कोटी लोकांच्या जनादेशाचा आदर महत्त्वाचा आहे. निर्वाचित नेत्यांच्या अधिकारांची पायमल्ली मी होऊ देणार नाही’ असे ते म्हणाले.