दहशतवादाच्या मुद्दय़ावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीच्या प्रस्तावाला भारताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास गुरुवारी पाकिस्तानने व्यक्त केला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी याबाबत भारताचे उच्चायुक्त टी सी ए राघवन यांच्याशी चर्चा करून दहशतवादाच्या मुद्दय़ावर दोन्ही देशांनी योग्य दृष्टिकोण ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. दहशतवादाच्या मुद्दय़ावर दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीबाबत पाकिस्तान अधिक गंभीर असल्याचे तसेच आमच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते एजाज चौधरी यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतीय उच्चायुक्तांशी चर्चेदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीबाबत मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे आणखी वेगळ्या पद्धतीने या बैठकीसाठी तसेच बैठकीतील मुद्दय़ांसाठी प्रस्ताव पाठविण्याची गरज नसल्याचे चौधरी यांनी सांगितले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होऊ नये अशी दोन्ही देशांच्या नेत्यांची इच्छा आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी याबाबत पुढाकार घेतलेला आहेच तसेच दोन्ही देशांच्या लष्करी कारवाईविषयीचे महासंचालकांची २५ आणि २९ ऑक्टोबर रोजी सविस्तर चर्चा होऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबाबत एकमत झाल्याचेही चौधरी यांनी सांगितले.