06 March 2021

News Flash

पाकिस्तानची दातखीळ!

भारताच्या कारवाईबाबत नन्नाचा पाढा

| September 30, 2016 01:34 am

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ

भारताच्या कारवाईबाबत नन्नाचा पाढा; नंतर उलटसुलट दावे

भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरात घुसत केलेल्या कारवाईने भांबावलेल्या, गडबडलेल्या पाकिस्तानला सुरुवातीला काय प्रतिक्रिया द्यावी हेच सुचत नव्हते. हळूहळू परिस्थितीचे आकलन झाल्यानंतर पाकिस्तानने पहिली प्रतिक्रिया दिली की, भारतीय लष्कराने अशी काही कारवाईच केलेली नाही. त्यानंतर त्यांची दुसरी प्रतिक्रिया होती की, सीमेपलीकडून भारताने गोळीबार केला आणि त्यालाच ते लक्ष्यभेद (सर्जिकल स्ट्राइक) असे गोंडस नाव देत प्रसारमाध्यमांना अतिरंजित वृत्त पुरवित आहेत..

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर भारताने गुरुवारी सकाळी या कारवाईची माहिती पाकिस्तानला दिली. त्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि सरकार यांची गडबडच उडाली. प्रथमत भारतीय लष्कराने अशी काही कारवाईच केली नाही, असे पाकिस्तानी लष्कराने पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सांगितले. मात्र, त्यानंतर आपल्याच वक्तव्यावरून घूमजाव करत भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केलेली नसून केवळ सीमेपलीकडून गोळीबार केला असल्याचा दावा केला. त्यानंतर पाकिस्तानी लष्करी सूत्रांनी भारत वस्तुस्थितीची मोडतोड करून कारवाईविषयीचे चित्र अतिरंजित करत असल्याचा कांगावा केला. परंतु दिवसअखेरीस पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी वस्तुस्थितीचा स्वीकार करत भारताच्या कृत्याचा निषेध करणारे वक्तव्य केले.

लष्करी सज्जतेचा आढावा

शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराच्या सज्जतेचा आढावाही घेतला. दिवसभर त्यांच्या कार्यालयात बैठकांचा जोर सुरू होता. लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी पंतप्रधानांना लष्करी सज्जतेची माहिती दिली. तसेच कोणत्याही परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी लष्कर तयार असल्याचा विश्वास दिला. भारताच्या कारवाईनंतर प्रथमत राहील शरीफ यांनी पंतप्रधानांना ‘भारताच्या दाव्यात काहीच तथ्य नाही’, असे सांगितले. मात्र, नंतर त्यांनी परिस्थिती मान्य केली. शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर जांजुआ यांनीही एकंदर परिस्थितीचा आढावा घेत पंतप्रधानांना त्याची माहिती दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गस्त वाढवण्यात आल्याचे पंतप्रधानांना सांगण्यात आले. शरीफ यांनीही त्यावर समाधान व्यक्त केले.

भारताने सीमेवर केलेली कारवाई निषेधार्ह आहे. या कारवाईचा निषेध करावा तितका थोडाच आहे. उपखंडात शांतता नांदावी अशी आमची भूमिका असून त्यास आमचा दुबळेपणा समजण्याची गल्लत भारताने करू नये. आमच्या भूभागाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि कोणत्याही हल्ल्याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी आमची सुरक्षा दले सदैव सज्ज आहेत. नवाझ शरीफ, पाकिस्तानी पंतप्रधान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:34 am

Web Title: nawaz sharif comment on surgical strike
Next Stories
1 यूएस ओपन : मॅनहटनचा मराठा
2 सीमेपलीकडे होणारा व्यापार सुरूच..
3 Video: ‘सुनो गौर से दुनिया वालों…’ गाण्यावर जवानांचा जल्लोष!
Just Now!
X