पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना तिथल्या न्यायालयाने पदच्युत केल्यावर यापुढे काय हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. पाकिस्तानमध्ये नावाला लोकशाही असली तरी तिथे लष्कराचं मोठं वजन आहे त्यामुळे आता निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा घेत लष्कर पुन्हा फायदा घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नवाझ शरीफांची पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा टर्म सुरू होती. याआधी ते 1990 ते 1993 तसंच 1997 ते 1999 असं दोनदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. दुसऱ्या वेळी त्यांना पदच्युत करत लष्करप्रमुख परवेझ मुशर्ऱफ यांनी सत्ता हस्तगत केली होती.
‘पनामा पेपर्स’ संदर्भात तेहरिक ए इन्साफसोबतच काही विरोधी पक्षांनी पाकिस्तानी कोर्टांमध्ये याचिका दाखल केली होती. त्यानुसार कोर्टाने सहा जणांची चौकशी समिती नेमून नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात चौकशी सत्र सुरू केलं होतं. नवाझ शरीफ यांनी पैशाचा गैरवापर करत लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केली असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. हेच आरोप सिध्द झाल्याने त्यांना आता पदावर राहायला अपात्र ठरवलं गेलं आहे. आता यानंतर पाकिस्तानमध्ये काय होणार याकडे सर्वांचं आणि विशेषत: भारताचं लक्ष लागून राहिलं आहे

1. पाकिस्तानमधल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत लष्कर सत्ता ताब्यात घेऊ शकेल. असं झालं तर ते भारतासाठी तसंच या भागातल्या राजकीय परिस्थितीसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. लष्कराने सत्ता हातात घेतली तर पुढे काय होईल याचा आताच अंदाज येणं कठीण असलं तरी दक्षिण आशिया तसंच अफगाणिस्तानमधल्य़ा परिस्थितीवर याचा निश्चितच परिणाम होईल.

2. नवाझ शरीफ यापुढे त्यांच्या पदावर त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून त्यांचा भाऊ शाहबाजची नेमणूक करू शकतात. शाहबाज हा सध्या पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांताचा मुख्यमंत्री आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘शरीफ सरकार’ त्यांचा उर्वरित कार्यकाल पूर्ण करू शकेल.

3. नवाझ शरीफांना पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवल्यावर तेहरिक ए इन्साफ चे नेते आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान यांच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ होण्याची शक्यता आहे. खान यांनी नवाझ शरीफ यांच्याविरोधात आरोप लावून धरले होते. आता निवडणुका झाल्या तर त्यांच्या पक्षाला चांगला फायदा होण्याची चिन्हं आहेत