पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आज संध्याकाळी अटक होणार असताना दुसरीकडे लंडन पोलिसांनी त्यांच्या नातवंडांना ताब्यात घेतलं आहे. लंडनमधील घराबाहेर अपमान करत उद्धट भाषेत बोलणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

नवाज शरिफ यांच्या मुलाचा लंडनमधील पार्क लेन येथील अॅव्हनफिल्ड येथे फ्लॅट आहे. नवाज शरिफ यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यापासून तिथे समर्थकांसह निषेध करणाऱ्यांचीही गर्दी होत आहे.

अॅव्हनफिल्ड भ्रष्टाचार प्रकरणी नवाज शरिफ यांना १० वर्षे तर त्यांची कन्या मरियम यांना ७ वर्षांची आणि जावई कॅप्टन (निवृत्त) सफदर यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज संध्याकाळी नवाज शरिफ आणि मरियम यांना अबु धाबी विमानतळावर अटक होणार आहे. तेथून त्यांना लाहोरला आणण्यात येणार आहे. नवाज यांना सुमारे ७३ कोटी रुपये आणि मरियम यांना सुमारे १८.२ कोटी रुपये इतका दंडही ठोठावण्यात आला आहे.

गुरुवारी नवाज शरिफ यांचा निषेध करण्यासाठी काही लोक जमा झाले होते. त्यांच्यामधील एका व्यक्तीने आक्षेपार्ह शब्द वापरल्याने शरीफ यांचे नातू जुनैद आणि झाकरीया यांनी त्याला मारहाण केली. दोघांनीही त्यांची कॉलर पकडून त्याला मारहाण केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोतच जुनैद आणि झाकरीया यांना ताब्यात घेतलं. जुनैद याने पोलिसांना जमावाने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं आहे.