पाकिस्तानमध्ये ११ मे रोजी झालेल्या निवडणुकीत विजय प्राप्त केल्याबद्दल पीएमएल-एन पक्षाचे अभिनंदन करणाऱ्या जाहिराती मीडियाला दिल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी एका ज्येष्ठ अधिकाऱ्याला बुधवारी पदावरून दूर केले. नॅशनल हायवे आणि मोटरवे पोलीसप्रमुख झफर अब्बास लूक यांनी अनेक दैनिकांना जाहिराती दिल्या होत्या आणि त्यांनी याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणाने शरीफ यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्यात आले. लूक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही शरीफ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
त्यापूर्वी शरीफ यांनी सरकारी विभाग आणि संघटनांनी दिलेल्या जाहिरातींची दखल घेतली होती. अशा प्रकारच्या जाहिरातींमुळे देशाच्या तिजोरीवर बोजा पडतो. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती का देण्यात आल्या त्याचे स्पष्टीकरण द्यावे, अशा नोटिसाही बजाविण्यात आल्या आहेत. नॅशनल हायवे आणि मोटारवे पोलीस त्याचप्रमाणे नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानने याबाबत दिलेली स्पष्टीकरणे आपल्याकडे सादर करण्याचे आदेशही शरीफ यांनी दिले आहेत.