पाकिस्तान हा देश लवकरच अल्पसंख्यांकांचे हितसंबंध जपणारा देश म्हणून ओळखला जाईल असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले. पाकिस्तानमधील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या काटस राज कॉम्प्लेक्स, चकवाल येथील मंदिराच्या जिर्णोद्धार प्रसंगाचा नवाज शरीफ यांच्या हस्ते आज शुभारंभ झाला. या मंदिराला भेट देणारे नवाज शरीफ हे पहिले पाकिस्तानी पंतप्रधान ठरले. मी केवळ येथील मुस्लिमांचाच पंतप्रधान नसून हिंदू, शीख आणि ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समुदायाचा देखील मी पंतप्रधान आहे असे ते यावेळी म्हणाले.

तो दिवस दूर नाही जेव्हा पाकिस्तानची ओळख एक अल्पसंख्याक समुदाय येथे गुण्यागोविंदाने नांदेल. हे राष्ट्र अल्पसंख्याक समुदायाशी मैत्रीने राहणारे राष्ट्र म्हणून नावाजले जाईल. या देशातील अल्पसंख्यांक समुदायाच्या उन्नतीसाठी आमचे सरकार अनेक पावले उचलत आहे असे ते यावेळी म्हणाले. हिंदू आणि शीख समाजाच्या प्रार्थनास्थळांचे, मंदिरांचे जतन व्हावे त्यांचा जिर्णोद्धार व्हावा यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या स्थळांचे जतन व्हावे असे सरकारचे आदेश आहेत असे ते म्हणाले.

मंदिरांचे आणि गुरुद्वारांचे जतन व्हावे यासंबंधी इव्हाक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचे चेअरमन सिद्दिकी फारुक यांना सूचना दिल्या गेल्या आहेत असे ते म्हणाले. बाबा गुरू नानक आणि गांधार विद्यापीठांचे पुनर्निमाण व्हावे याकरिता आमचे पूर्णतः समर्थन असेल असे नवाज शरीफ यांनी म्हटले. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची शिकवण इस्लाममध्ये आहे, असे ते म्हणाले. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी पंतप्रधान शरीफ यांनी धार्मिक सलोख्याची अनेक उदाहरणे यावेळी दिली.

अल्पसंख्यांक समुदाय आणि बहुसंख्यांक समुदायांना समान वागणूक मिळावी अशी शिकवण इस्लाममध्ये असल्याचाही त्यांनी दाखला दिला. मुस्लीम, ख्रिश्चन, हिंदू, शीख, पारसी आणि बहाई या सर्व समाजांनी एकत्र येऊन एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून पाकिस्तानच्या प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केली. प्रत्येक समुदायाने शांतता आणि समृद्धी वाढविण्यास हातभार लावावा असे ते यावेळी म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या सिनेटने हिंदू विवाह कायद्याला मंजुरी देऊन हिंदू समाजाच्या विवाहांना कायदेशीर मान्यता मिळवून दिली आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दंड ठोठावला जाईल आणि शिक्षा मिळेल अशी तरतूद करण्यात आली आहे.