पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम शरीफ यांना लाहोर विमानतळावर उतरताच अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातील एएनबीने अटकेची ही कारवाई केली. लंडन मधील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने दोघांना दोषी ठरवले आहे. इतिहाद एअरवेजच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर शरीफ यांना कायदेशीर वॉरंट बजावण्यात आले.

आज संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास नवाज शरीफ मुलगी मरियमसह अबूधाबीहून पाकिस्तानच्या दिशेने रवाना झाले. शरीफ यांच्या विमानाला तीन तास विलंब झाला. रात्री ९.१५ च्या सुमारास त्यांच्या विमानाने लाहोर विमातनळावर लँड केले. त्यानंतर त्यांना लगेच अटक करण्यात आली.

नवाज यांच्या अटकेआधी पाकिस्तानात मोठा तणाव निर्माण झाला होता. लाहोर विमानतळाबाहेर पीएमएल-एनचे कार्यकर्ते मोठया संख्येने जमलेले असल्यामुळे त्यांना हॅलिकॉप्टरने रावळपिंडीच्या अदायला तुरुंगात नेण्यात येणार आहे. पंजाब प्रांताच्या सरकारने खबरदारी म्हणून लाहोरमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू केले आहे. लाहोरमध्ये एकूण १० हजार सुरक्षारक्षक तैनात आहेत.

लाहोरमध्ये शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमकी सुरु आहेत. पाच पोलीस जखमी झाले आहेत. ३७८ जणांना अटक करण्यात आली आहे. लाहोरला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.

आज सकाळी नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियन लंडनहून अबूधाबी येथे पोहोचले. तिथे काही काळ विश्रांती केल्यानंतर संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास पाकिस्तानला रवाना झाले. एएनबीने शरीफ यांच्या अटकेची पूर्ण तयारी केली आहे. नवाज शरीफ यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची तर त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला मुलीला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. तर मुलाला एका वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोर्टाने नवाज शरीफ यांना ८० लाख पाऊंडचा दंड आणि त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला २ लाख पाऊंडचा दंड ठोठावला आहे. भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.