पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आपल्या आडनावाला सर्वार्थाने जागणारे असले तरी, त्याखेरीज पार्लमेण्टमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ही नवी ओळख त्यांनी आपल्या जनतेला करून दिली आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीआधारे ही बाब उघड झाली आहे.
पाकिस्तानमध्ये निवडून आलेले कित्येक जनसेवक हे अब्जो आणि लाखोंच्या संपत्तीचे मालक आहेत. काहींचे साखर, कापड उद्योग आहेत, तर काही जनसेवक हे धनाढय़ व्यापारी आहेत. मात्र या सगळ्यांहून अधिक संपत्ती ही शरीफ यांच्या वाटय़ाला आली आहे. १४.३ अब्ज रुपयांची जमीन, १.३ कोटींची गुंतवणूक आणि विविध कारखान्यांमधील भागीदारी आणि बँकेतील लक्षावधी रुपयांची ठेव याआधारे शरीफ हे सर्वाधिक श्रीमंत नेते आहेत. निवडणूक आयोगाला त्यांनी दिलेल्या माहितीपत्रात त्यांच्या या श्रीमंतीसोबत वाहनश्रीमंतीही समोर आलेली आहे. त्यांच्याकडे टोयोटा लॅण्ड क्रूझर आणि दोन मर्सिडीज बेन्झ या आलिशान गाडय़ा आहेत. त्यांच्या पत्नीकडे १.५ कोटी रुपयांचे सोने आहे.तेहरिक ए इन्साफचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान शरीफ यांच्या तुलनेत फारच गरीब आहेत. गेल्या निवडणुकी वेळी त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीहून कमी संपत्ती त्यांच्याजवळ आहे. पाच लाख इतकी नगण्य रकमेचे मालक असल्याचे त्यांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते; तर जमशेद दस्ती सर्वात कमी संपत्ती असलेले नेते ठरले आहेत. त्यांनी आपली कमाई शून्य रुपये इतकी दाखविली असून, बँकेमध्येही शून्य रक्कम असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय पंजाब येथील शाहबाज शरीफ हे नवाझ यांचे बंधू करोडपतींच्या पंगतीत बसणारे आहेत. त्यांच्या पत्नींकडे त्यांच्याहून अधिक संपत्ती असल्याचे त्यांनी उघड केले आहे.