पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे कोंडीत सापडलेल्या पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तानी सरकारने आता आपण खंबीरपणे पाकिस्तानी लष्कराच्या पाठिशी उभे असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही परकीय हल्ल्यांचा मुकाबला करण्यास पाकिस्तान पूर्णपणे तयार असून, सर्व देशवासिय आणि सरकारचा पाकिस्तानी लष्कराला पूर्ण पाठिंबा असल्याचे नवाज शरीफ यांनी शुक्रवारी सांगितले.
भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे शुक्रवारी दुपारी नवाज शरीफ यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील स्थिती आणि नियंत्रण रेषेजवळ करण्यात आलेली कारवाई यावर चर्चा केली. पाकिस्तानी ‘जिओ टीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत भारताकडून करण्यात आलेल्या गोळीबाराचा निषेध करण्यात आला. या गोळीबारामध्ये केवळ दोन पाकिस्तानी जवान मारले गेल्याचा उल्लेख मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला.
उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये १९ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर बुधवारी रात्री साडेबारा ते पहाटे साडेचार या वेळेत भारतीय लष्कराच्या विशेष प्रशिक्षित कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करून तेथील सात दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ३० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात कमांडोंना यश आले.
सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा पाकिस्तानने फेटाळला आहे. नियंत्रण रेषेजवळ केवळ भारतीय हद्दीतून गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये दोन पाकिस्तानी जवान मारले गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सरकार यावरच ठाम राहिले. कोणत्याही परकीय शक्तींकडून पाकिस्तानवर होणाऱ्या हल्ल्यांना तोंड देण्यास समर्थ असल्याचे नवाज शरीफ यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी सहकारी मंत्र्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील भाषणाबद्दल तसेच विविध देशांतील नेत्यांच्या भेटीगाठीबद्दल माहिती दिली.