पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीशी होणाऱ्या द्विपक्षीय बैठकीच्या आधी व जम्मू-काश्मिरवरील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दोन्ही देशांच्या संबंधांवर वक्तव्य केले आहे. पाकिस्तानला भारतासोबतचे संबंध दृढ करायचे असून, काश्मिर प्रश्न चर्चेनेच सुटणार असल्याचे शरीफ म्हणाले.
दोन्ही देश संरक्षणावर प्रचंड खर्च करत असून, त्याचा परिणाम सार्वजनिक क्षेत्रावर होत असल्याचे शरीफ म्हणाले.
“मी दोन्ही देशांना कधी नव्हते एवढे जवळ आणल्याचा मला अभिमान आहे. कोणत्याही दुसऱ्या देशाला भेट देण्याआधी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९९ मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. तोच मागे पडलेला १९९९ चा पायंडा पुढे घेऊन जाण्यास आम्ही तयार आहोत,” असे ‘वॉल स्ट्रिट जर्नल’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शरीफ म्हणाले.
शरीफ व पंतप्रधान सिंग यांच्या न्यूयॉर्कमधील भेटीची वेळ रविवार, २९ सप्टेंबर ही निश्चित करण्यात आली असून, या चर्चेवर जम्मू-काश्मिरवरील अतिरेकी हल्ल्याचे सावट आहे. भारतासोबतच्या संबंधांविषयी पाकिस्तानची भूमिका काय असेल हे निवडणुकीच्या आधीच त्यांनी जाहिर केली असल्याचे नवाझ शरीफ म्हणाले.
“आम्हाला भारतासोबत मजबूत संबंध प्रस्तापित करायचे आहेत. काश्मिरसह भारतासोबतच्या सर्व समस्यांवर आम्हाला शांततेच्या मार्गाने तोडगा काढायचा आहे. आणि मी भारताकडे मैत्रीचा हात पुढे करणार असल्याचे म्हणालो होतो,” असे शरीफ या मुलाखतीमध्ये म्हणाले.               
नवाझ शरीफ देखील राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेसाठी अमेरिकेला गेले आहेत. त्यांच्या ‘पाकिस्तान मुस्लिम लिग – नवाझ’ या पक्षाला नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले असल्याचे शरीफ म्हणाले. हे बहुमत म्हणजे भारताकडे पुढे केलेल्या मैत्रीच्या हाताला पाकिस्तानच्या जनतेचा पाठिंबा असल्याचे शरीफ म्हणाले.