भारत-पाक चर्चेवर आणि संबंधांवर परिणाम झाल्याची शरीफ यांची कबुली
भारताच्या पठाणकोट हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील संशयित पाकिस्तानी सहभागाबाबतचा तपास लवकरच पूर्ण होणार असून त्याचा अहवाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शनिवारी केली.
या हल्ल्याने भारताशी असलेल्या संबंधांवर विपरीत परिणाम झाल्याची कबुलीही शरीफ यांनी दिली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तान भेटीनंतर उभय देशांतील संबंध सौहार्दाचे होतील, अशी चिन्हे होती. त्यावर या हल्ल्यांनी पाणी पडले आहे, असेही शरीफ पत्रकार परिषदेत म्हणाले.
पठाणकोट हल्ल्यात आमच्या भूभागाचा वापर झाला आहे का, याची छाननी आम्ही अगदी खोलवर जाऊन करीत आहोत. त्यातून जे काही सत्य बाहेर येईल ते जगासमोर आणले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दहशतवादाविरोधात लढा उग्र होत आहे. त्यामुळेच वैफल्यग्रस्त झालेले अतिरेकी आपले अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत आहेत. त्यातूनच असे हल्ले होत आहेत. आता उरल्यासुरल्या दहशतवादाचाही बीमोड केला जाईल, असेही शरीफ म्हणाले.
या हल्ल्याच्या तपासासाठी शरीफ यांनी पंजाब प्रांताच्या अतिरिक्त पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली सहाजणांची समिती नेमली आहे.
या हल्ल्याप्रकरणी अटक झालेल्या एकाही संशयितावर या घडीला आरोप मात्र निश्चित झाले नसल्याचे पंजाबचे कायदा मंत्री राणा सनाउल्लाह यांनी जाहीर केले आहे. या हल्ल्याशी जैश ए महम्मद संघटनेचा संबंध आहे का, याची तपास यंत्रणाही त्याची छाननी करीत आहेत, असे शरीफ अखेरीस म्हणाले.