भारताशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित होण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याचा निर्धार पाकिस्तानचे नवे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केला आहे. काश्मीरसारख्या ज्वलंत प्रश्नावर सक्रिय तोडगा काढण्यासही नवाझ शरीफ यांनी प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे गुरुवारी शरीफ यांनी जाहीर केली.
पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरीफ यांनी आपल्या सरकारचा परराष्ट्र धोरणाचा प्राधान्यक्रम जाहीर केला. पाकिस्तानातील सर्व प्रमुखांना पाठविलेल्या संदेशात शरीफ यांनी, शेजारील देशांकडे तातडीने लक्ष देण्याचे फर्मानही सोडले.
जोपर्यंत आपल्या प्रदेशात शांतता प्रस्थापित होणार नाही, तोपर्यंत विकासाचे आपले प्रयत्न निष्फळ ठरतील. त्यामुळे भारतासमवेतच्या संबंधांमध्ये सलोखा निर्माण होण्यासाठी परिणामकारक पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे शरीफ यांनी नमूद केले. यापूर्वीही म्हणजेच १९९९ पूर्वी आपण भारताशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता, असेही ते म्हणाले.
दोन्ही देशांमधील चर्चा ज्या स्तरावर थांबली होती, तेथूनच पुन्हा एकदा नव्याने चर्चेला सुरुवात करण्यात येईल. भारतासमवेत आपल्याला उत्तम संबंध प्रस्थापित करावयाचे आहेत. काश्मीरसह दोन्ही देशांमधील अन्य प्रश्न शांततापूर्ण चर्चेने सोडवावयाचे आहेत, असेही ते म्हणाले. मुशर्रफ यांनी १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील खंडित केलेली शांतता प्रक्रिया पुन्हा सुरू करावयाची आहे, असेही ते म्हणाले.
अफगाणिस्तानात स्थिर सरकार आणि शांतता नांदण्यासाठी प्रादेशिक ऐक्याचे महत्त्व शरीफ यांनी पाकिस्तानी राजदूतांना पाठविलेल्या संदेशात व्यक्त केले आहे. अफगाणिस्तानात शांततेसाठी धोरणाचा पाठपुरावा करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेबाबतच्या संबंधांवर भाष्य करताना शरीफ यांनी नमूद केले आहे की, दोन्ही देशांना स्वारस्य असलेली अनेक क्षेत्रे आहेत.
राजकीय पक्ष, सुरक्षा दले, मीडिया आदींच्या सहकार्याने दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय मतैक्य तयार करणे गरजेचे असून, दहशतवाद्यांना परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक साहाय्यालाही वेसण घालण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान कार्यालयाचे नामकरण
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवाझ शरीफ यांनी सर्वप्रथम आपल्या कार्यालयाचे नामकरण केले आहे. पंतप्रधानांचे सचिवालय याऐवजी आता पंतप्रधानांचे कार्यालय, असे नामकरण करण्यात आले आहे.
पंजाब प्रांतातील ज्येष्ठ अधिकारी नासीर मेहमूद खोसा यांची पंतप्रधानांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर फवाद हसन यांची पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.