छत्तीसगड येथील काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या नक्षली हल्ल्यातून बचावलेले काँग्रेस आमदार कावासी लखमा यांची नार्को चाचणी व्हावी अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावेळी आमदार लखमाही तेथे उपस्थित होते. लखमांच्या समोर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना नक्षलवाद्यांनी ठार मारले होते व लखमांना सोडून देण्यात आले होते.

यावरून “लखमा हे घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती देऊ शकतील कारण, त्यांचा या हल्ल्यातून बचाव होण्यापूर्वी नक्षलवाद्यांशी त्यांचा संवाद झाला असण्याची शक्यता आहे. ते या घटनेचे साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांची चौकशीही सविस्तररित्या होणे गरजेचे आहे.” असे भाजपचे प्रवक्ते अजय चंद्राकार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.