News Flash

शहीद जवानांची संख्या २२ वर

नक्षलवाद्यांविरोधात बिजापूर जिल्ह्य़ातील तारेमच्या जंगलात २ एप्रिलला सुरू केलेल्या मोहिमेत शेकडो जवान सहभागी झाले होते.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला

संरक्षण दलांची पथके आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडच्या जंगलात शनिवारी झालेल्या चकमकीच्या ठिकाणी रविवारी १७ जवानांचे मृतदेह आढळले. या चकमकीत आतापर्यंत २२ जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी घडवलेले हे अलीकडच्या काळातील मोठे हत्याकांड आहे.

चकमकीत शहीद झालेल्या जवानांमध्ये डिस्ट्रिक्ट रिझव्‍‌र्ह गार्ड (डीआरजी)च्या आठ, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकाच्या सात, स्पेशल टास्क फोर्सच्या सहा आणि ‘सीआरपीएफ’च्या ‘बस्तरिया’ बटालियनच्या एका जवानाचा समावेश असल्याचे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले. कोब्रा पथकाचे अनेक जवान अद्याप बेपत्ता असून त्यांचा जंगलात शोध घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. नक्षलवाद्यांनी नियोजनपूर्वक हा घातपात घडवला, परंतु संरक्षण पथकांचे जवान त्यांच्याशी धैर्याने लढले, असेही त्यांनी सांगितले. या चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांचे मृतदेह शनिवारी सापडले होते.

तेकलगुडा गाव आणि परिसरातील छोटय़ा टेकडय़ांवर मोक्याच्या जागांवरून सुमारे ४०० नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. जवानांवर अचानक हल्ला केला. चकमकीच्या ठिकाणी रस्ते, पायवाटा आणि शेतांमध्ये गोळ्यांनी चाळण झालेले जवानांचे मृतदेह आढळले. मृतदेहांवर गोळ्यांबरोबरच धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणाही आढळल्या, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

नक्षलवाद्यांविरोधात बिजापूर जिल्ह्य़ातील तारेमच्या जंगलात २ एप्रिलला सुरू केलेल्या मोहिमेत शेकडो जवान सहभागी झाले होते. एकाच वेळी बिजापूर जिल्ह्य़ातील तारेम, उसूर, पामेद आणि सुकमा जिल्ह्य़ातील मिनपा आणि नरसापूरम अशा पाच ठिकाणांहून ही कारवाई सुरू करण्यात आली होती. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली होती, असेही सुंदरराज पी. यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, संरक्षण दलांवरील अनेक घातपाती हल्ल्यांमध्ये सामील असलेल्या पीपल्स लिबरेशन गुरीला आर्मी (पीएजीए) बटालियन १चा म्होरक्या हिदमाबद्दल माहिती गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्याला घेरण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती.

नक्षलवाद्यांविरोधातील लढाई सुरूच राहील : शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून या हल्ल्याची माहिती घेतली. त्यांनी सीआरपीएफचे संचालक कुलदीप सिंह यांना तातडीने छत्तीसगडला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. चकमकीतील जवानांचे बलिदान कायम स्मरणात राहील आणि शांततेच्या शत्रुविरोधातील लढाई यापुढेही सुरू ठेवण्यात येईल, असेही शहा यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 1:59 am

Web Title: naxal attack in chhattisgarh akp 94
Next Stories
1 आसाम, तमिळनाडू,केरळमध्ये उद्या मतदान
2 करोना प्रतिबंधासाठी सामूहिक जबाबदारीचे पालन आवश्यक
3 ४३ टक्के लसीकरण पाच राज्यांत
Just Now!
X