नक्षलवाद्यांकडून दि. २५ म्हणजे उद्या महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये बंदची घोषणा करण्यात आली आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओदिशा, तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांकडून प्रथमच मध्य प्रदेशमध्ये बंदची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात गडचिरोली येथे नक्षलवाद्यांना बनावट चकमकीत मारल्याचा आरोप करत त्यातील मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे सांगण्यात येते. भाजपा नेत्यांना मारून गावातून पळवून लावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. बंदच्या प्रचार-प्रसारासाठी विविध ठिकाणी बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले आहेत.

दरम्यान, सुकमा, पुसवाडा जवळ एक पुल उभारण्यात येत आहे. तेथील वळण पार करताना गस्तीवर असलेल्या कोब्रा पथकातील एक जवान आयईडीच्या स्फोटात जखमी झाला. राजेश असे या जखमी जवानाचे नाव असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते. उपचारासाठी त्याला रायपूर येथे हलवण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. दुसरीकडे नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाच्या डेपोला आग लावली. यात लाखो रूपयांची लाकडे जळून खाक झाली आहेत. मुलछेरा येथे नक्षलवाद्यांनी सरकारचा निषेध करणारे फलक लावले आहेत.