नक्षलवाद्यांच्या अनेक घातपातांच्या कारवायांमध्ये सक्रीय सहभाग असलेला व अनेक दिवसांपासून पोलिसांना हवा असणाऱ्या नक्षलींच्या एका डेप्युटी कमांडरने रविवारी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

मुचकी बुद्र उर्फ नरेश (32) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर तब्बल आठ लाख रूपयांचा इनाम होता. त्याने पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांच्यासमोर दंतेवाडा येथे शरणागती पत्कारली. तो दंतेवाडामधील मलंगीर भागात कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांच्या लष्करी तुकडी क्रमांक – २४ चा डेप्युटी कमांडर होता.

अनेक नक्षली हल्ल्यांमध्ये त्याचा सशस्त्र सहभाग होता. यात २०१० मध्ये काँग्रेस नेते अवधेश गौतम यांच्यावर नकुलनार गावातील निवासस्थानी झालेला नक्षली हल्ला, ज्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू तर एक नक्षलवादी ठार झाला होता. तसेच, २०१२ मध्ये सीआयएसएफच्या पथकावर किरंदूलमध्ये झालेला हल्ला, ज्यामध्ये सहा जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. यांचा प्रामुख्याने समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पल्लव यांनी दिली.

आपण २००७ मध्ये नक्षलवादी संघटनेत सहभागी झालो व २०१० मध्ये डेप्युटी कमांडर बनलो असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. शिवाय शस्त्रास्र बाळगण्यासाठी त्याला संघटनेकडून प्रोत्साहन स्वरूपात १० हजार रुपये देखील देण्यात आलेले आहेत, अशीही पोलिसांनी माहिती दिली. सरकारच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणानुसार त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.