संशयित नक्षलवाद्यांनी रेल्वेकडून एक कोटी रुपये, शस्त्रे आणि स्फोटकांच्या लेव्हीची मागणी केली असून, मागण्या मान्य न झाल्यास बिहारमधील मोतिहारी आणि पनिआहवा स्थानकांदरम्यानचा लोहमार्ग उडविण्याची धमकी दिली आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयात टपालाद्वारे एक पत्र पाठविण्यात आले असून त्यामध्ये वरील मागणी करण्यात आली आहे. या पत्रावर नक्षलवादी केंद्राचा कमांडर असल्याचा दावा करणाऱ्या रामजी साहनी याची स्वाक्षरी आहे, असे विभागीय सुरक्षा अधिकारी कुमार निशांत यांनी सांगितले.
एक कोटी रुपये रोख रक्कम देण्याबरोबरच ५० रायफली, ५० स्वयंचलित रायफली, ५० कार्बाइन आणि तीन हजार गोळ्यांची मागणी साहनी यांनी केली असून, मागण्या मान्य न झाल्यास लोहमार्ग उडवून देण्याची धमकी दिली आहे. या पत्रात तीन भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत, त्यापैकी दोन भ्रमणध्वनी बंद आहेत, तर एक भ्रमणध्वनी उचलण्यात येत नाही, असे कुमार निशांत यांनी सांगितले.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून भ्रमणध्वनी क्रमांक कोणाचे आहेत त्याचा शोध घेतला जात आहे. काही समाजकंटकांनी हे पत्र पाठविले असावे, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. मात्र अशा प्रकारचे पत्र आल्याने सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.