छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एक प्रवासी बस पेटवून दिली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. विजापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील भोपालपटनम ठाण्याच्या परिसरातंर्गत तोडेमपारा गावानजीक नक्षल्यांनी गुरूवारी रात्री प्रवाशांना बसमधून बाहेर काढल्यानंतर बसला आग लावली.

ही बस जगदलपूरवरून बारेगुडा गावाकडे जात होती. तोडेमपारा येथे बस आल्यानंतर खेडुतांच्या वेशात असलेल्या नक्षल्यांनी बस थांबवली. त्यानंतर आतील प्रवाशांना खाली उतरवले आणि बस पेटवून दिली.

पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, बस पेटवल्यानंतर नक्षल घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी रवाना झाले. या घटनेत एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. पोलिसांनी या घटनेतील नक्षल्यांचा शोध सुरू केला आहे.