आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याचाही पुरावा

गया : बिहारच्या गया जिल्ह्य़ात संशयित माओवाद्यांनी एका शाळेची इमारत स्फोटाने उडवून दिली आणि सीएए, एनआरसी, एनपीए आणि ‘हुकूमशाही भाजप सरकार’ यांचा निषेध करणारी पत्रके मागे ठेवली, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

लोकसभा निवडणुकांपूर्वी नक्षलवाद्यांनी या भागात हल्ला केल्यामुळे, सीआरपीएफच्या १५३ बटालियनचे एक पथक या भागातील सोनेदाहा हायस्कूलमध्ये तळ ठोकून होते. ८ फेब्रुवारीला त्यांनी जवळच असलेल्या घनदाट जंगलातील स्वत:च्या तळावर मुक्काम हलवला. बांके बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील याच शाळेच्या रिकाम्या इमारतीत मंगळवारी रात्री हा स्फोट करण्यात आला. मात्र यात कुणीही जखमी झाले नाही, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा यांनी सांगितले.

स्फोटाच्या ठिकाणावरून पोलिसांनी काही हस्तलिखित पत्रके जप्त केली आहेत. त्यात ‘ब्राह्मणीवादी, हिंदुत्ववादी, हुकूमशहा भाजप सरकारविरुद्ध’ घोषणा असून, सुरक्षा दलांनी शाळेच्या इमारतीवर ‘ताबा’ मिळवण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. लोकांनी सीएए, एनआरसी व एनपीआरसारख्या कठोर उपायांविरुद्ध एकत्र यावे, असे आवाहनही या पत्रकांत करण्यात आले आहे.

या भागात सक्रिय असलेले नक्षलवादी सीएए- एनआरसी- एनपीआरविरोधातील निदर्शनांना पाठिंबा देत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. गेल्या रविवारी, नक्षलवादाशी संबंधांचा संशय असलेल्या ९ महिला चोवीस तास आंदोलन सुरू असलेल्या गया शहरातील शांतिबाग येथे जात असताना त्यांना पकडण्यात आले, असेही मिश्रा म्हणाले.

आपण भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य असून, शांतिबाग येथील निदर्शनांत भाग घेण्यासाठी आपल्याला ३०० ते ४०० रुपये मिळत होते अशी कबुली त्यांनी दिली, असाही दावा मिश्रा यांनी केला.