राज्यातील बस्तर क्षेत्रात नक्षलवाद्यांचे प्राबल्य असून त्यांना करण्यात येणारा शस्त्रपुरवठा, औषधे आणि अन्य मदत बंद करण्यात आल्याचा दावा छत्तीसगड पोलिसांनी केला आहे. शहरी भागांतून नक्षलवाद्यांना मोठय़ा प्रमाणावर मदत मिळत होती. त्याचप्रमाणे त्यांच्यासमवेत पत्रव्यवहारही करण्यात येत होता.
काणकेर येथील नऊ रहिवाशांना पोलिसांनी अलीकडेच अटक केली. हे रहिवासी नक्षलवाद्यांना वस्तू आणि आर्थिक मदत करीत असल्याचा संशय होता. अटक करण्यात आलेल्या नऊ जणांपैकी दोन जण बस्तरमधील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते प्रभाकर या विभागीय स्तरावरील अधिकाऱ्याच्या सूचनेवरून नक्षलवाद्यांना मदत करीत होते, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
बस्तर आणि महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्य़ातून  नक्षलवाद्यांना पाठविण्यात येणाऱ्या मदतीचे वाटप प्रामुख्याने प्रभाकरच करीत होता, असे अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीतून निष्पन्न झाले. नक्षलवाद्यांकडे पत्रव्यवहार करणाऱ्यांची चौकशी केली असता आपले नाव उघड होईल या भीतीने प्रभाकरने सध्या अभूजमाद येथील जंगलात आश्रय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रभाकर हा माकपचे (माओवादी) सरचिटणीस गणपती याचा जवळचा नातेवाईक असल्याचेही चौकशीतून निष्पन्न झाले असून गणपती हा आंध्र प्रदेशातील करीमनगर जिल्ह्य़ातील रहिवासी आहे. गणपतीशी असलेल्या नात्यामुळे प्रभाकर याच्यावर नक्षलवाद्यांना पुरवठा करणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी होती, असे सूत्रांनी सांगितले. अलीकडेच शरणागती पत्करलेला नक्षलवादी गुडसा उसेंडी आणि प्रभाकरची भूमिका जवळपास सारखीच होती.