छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भागातील आदिवासी ग्रामस्थांनी भरभरून मतदान केल्यामुळे नक्षलवाद्यांना धडकी भरलीये. मतदानावर बहिष्कार टाका, असा फतवा नक्षलवाद्यांच्या म्होरक्यांनी काढला असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करीत बस्तर, दंतेवाडा, कोंडागाव आणि नारायणपूर या भागातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. त्यामुळे नक्षलवाद्यांनी तातडीने बैठक घेऊन याबद्दल नाराजी व्यक्त केली.
गुप्तचर यंत्रणेमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दंडकारण्यमधील माओवादी कम्युनिस्ट संघटनेच्या नेत्यांनी नुकतीच एक बैठक घेऊन त्या भागात मतदानाला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मतदानावर बहिष्कार टाका, असे सांगितले असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान का केले गेले, याचा खुलासा यावेळी काही ग्रामस्थांकडेही मागण्यात आला. बस्तर, दंतेवाडा, कोंडागाव आणि नारायणपूर या भागातील नक्षलवाद्यांनीही तेथील ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. ग्रामस्थांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान का केले, याची कारणेही नक्षलवाद्यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना विचारल्याचे समजते.
नक्षलग्रस्त भागातील पोलीसांच्या खबऱयांनी या बैठकीबद्दल माहिती दिली. बैठकीत अजून कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे मात्र समजू शकलेले नाही.