आम आदमीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या खूपच चर्चेत आहेत. हातात झाडू घेऊन देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी निघालेल्या या नेत्यावर करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या यूट्यूबवर धूमाकूळ घालत आहे. २४ जानेवारीला यूट्यूबवर प्रदर्शित झालेल्या या व्हिडिओने अवघ्या सात दिवसांमध्ये १९ लाखांच्यावर हिट्स मिळवले आहेत.
राजकारणी, अभिनेता हे नेहमीच सोशल मिडियाच्या निशाण्यावर असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेता आलोकनाथ हे ट्विटर ट्रेण्डमध्ये होते. आलोकनाथ यांनी सुद्धा सदर व्हिडिओमध्ये अभिनय करून नेटिझन्समध्ये चर्चेत राहण्याची संधी सोडलेली नाही. व्हिडीओच्या सुरुवातीला अरविंद केजरीवालांच्या भूमिकेतील एक अस्वस्थ ‘आम आदमी’ झोपेतून जागा होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर, ‘बाबूजीं’ म्हणजेच आलोकनाथ त्याला आम आदमी पक्ष स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करताना दिसतात. लोकप्रिय होण्यासाठी मध्यमवर्गीय माणसासारखे दिसण्याची आवश्यकता असल्याचे सांगत आलोकनाथ केजरीवाल यांना  एक जाडजूड स्वेटर आणि पहारेक-याचा मफलर कानाभोवती गुंडाळण्याचा सल्ला देतात. आलोकनाथ केजरिवालांना नेहरुंची टोपी घालून नेहरुंच्याच कुटुंबियांविरुद्ध लढण्यास सांगतात. पार्टीची निशाणी ठरवितानाचा व्हिडिओमधील भाग खूपच विनोदी आहे. यानंतर आपल्या समोर येतो तो बाबूजींच्या आशीर्वादाचा प्रसंग. ‘इलेक्शनसे पहले बाबूजी के पैर नही छुओगे…केजरू’, ‘मेलोडी है चॉकलेटी’, आणि ‘दो मिनिट रुकिये मै धरणा करके आता हूँ’ यांसारखे विनोदी संवाद या व्हिडीओमध्ये आहेत.
सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाहणा-याचे संपूर्ण मनोरंजन होईल, असा हा व्हिडीओ आहे. सोशल मिडियाच्या निशाण्यापासून कोणीच वाचू शकत नाही या व्हिडीओतून प्रकर्षाने जाणवते.
“आशीर्वाद मिळवण्यासाठी ‘सबस्क्राइब’ करा, पुण्य मिळवण्यासाठी ‘शेअर’ करा.  #Sanskar”- आलोकनाथ