जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून नजरकैदेत असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री पिता-पुत्र फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांना आज काहीसा दिलासा मिळला. या दोघांची भेट घेण्यास राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या नेत्यांना परवानगी दिली. या भेटीनंतर अब्दुल्ला पिता-पुत्र सुखरुप असल्याचे पाहून आम्ही आनंदी आहोत अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी दिली.

या भेटीनंतर नॅशनल कॉन्फरन्सच्या दोन नेत्यांनी सांगितले की, त्यांचे नेतृत्वच तुरुंगात असल्याने यंदा पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढवल्या जाणार नाहीत. तर दुसरीकडे पक्षाचे नेते हसनैन मसूदी यांनी टिव्ही चॅनेलवर बोलताना सांगितले की, आम्ही त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो, यावेळी राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही.

भेटीदरम्यान ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांसोबत सेल्फी देखील घेतले. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र राणा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या १५ सदस्यीय शिष्टमंडळाने रविवारी अब्दुल्ला पिता-पुत्रांची भेट घेतली. यावेळी राणा म्हणाले, “आम्हाला आनंद आहे की ते दोघेही सुखरूप आहेत. मात्र, राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे ते व्यथीत असल्याचे आम्हाला जाणवले. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा राजकीय प्रक्रिया सुरु करायची असेल तर मुख्य प्रवाहातील नेत्यांना केंद्र सरकारला मुक्त करावं लागेल,” असेही ते यावेळी म्हणाले. कलम ३७० रद्द केल्यानंतर ८१ वर्षीय फारुख अब्दुल्ला यांना श्रीनगरस्थित आपल्या घरात तर ओमर अब्दुल्ला यांना राज्याच्या गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. याचवेळी राज्यातील प्रमुख पक्ष नॅशनल कॉन्फरन्स आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे (पीडीपी) प्रमुख नेते फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत आहेत. या पार्श्वभूमीवर नेत्यांची ही भेट महत्वपूर्ण होती. येत्या ९ ऑक्टोबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.