सरकार स्थापन करण्यासाठी पीडीपीला पाठिंबा द्यावयास तयार असल्याचे पत्र नॅशनल कॉन्फरन्सने राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्याकडे दिल्याने जम्मू-काश्मीरमधील राजकीय स्थितीला निराळेच वळण लागले आहे. गेली अनेक वर्षे परस्परांविरोधात हिरीरीने लढणाऱ्या पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यातील सूत जुळण्याच्या शक्यतेमुळे, आता राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार याविषयी कुतुहल निर्माण झाले आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पीडीपीला सर्वाधिक म्हणजे २८ जागांवर विजय मिळाला. मात्र त्यानंतर कोणत्या पक्षाचा पाठिंबा स्वीकारायचा याबाबत त्यांनी निर्णय न घेतल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली, असे मूद करतानाच जनमताचा आदर राखत आम्ही पीडीपीला पाठिंबा देत आहोत, असे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले.
भाजपला पाठिंबा नाहीच..
काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्सच्या तिकिटावर जिंकून आलेल्या आमदारांपैकी कोणीही भारतीय जनता पक्षास पाठिंबा देण्यासाठी उत्सुक नाही आणि त्यामुळे भाजपसह सत्ता स्थापन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले.

राज्यात विक्रमी मतदान होऊनही पीडीपीसमोर पाठिंब्याचा प्रश्न कायम आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला पाचारण करण्यापूर्वी आम्हाला चर्चेला बोलवावे, आम्ही पीडीपीला पाठिंबा देण्यास तयार आहोत.
– ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री