राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुखापतग्रस्त झाल्यामुळे बुधवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीच्या जनपथ रोडवरील निवासस्थानी पवार मंगळवारी संध्याकाळी पाय घसरून पडले होते. मात्र, बुधवारी सकाळी पवारांना पाय आणि पाठीमध्ये जास्त त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांनी उपचारासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, हेलिकॉप्टरने पवार यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात आणण्यात आले. यावेळी पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि कन्या सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर होत्या. डॉक्टरांकडून एक्स-रे आणि अन्य पाहणी करण्यात आल्यानंतर पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे निदान करण्यात आले.
दरम्यान, ही बातमी समजताच त्यांचे पुतणे अजित पवार राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा रद्द करून तातडीने मुंबईकडे धाव घेतली. याशिवाय, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनीदेखील ब्रीच कँडी रूग्णालयात जाऊन पवारांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पवारांवर उपचार केले जात असून, पुढील सात ते आठ दिवस त्यांना विश्रांती घेण्यासाठी रूग्णालयातच ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांकडून घेण्यात आला आहे.