News Flash

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, तासभर झाली चर्चा; तर्क-वितर्कांना उधाण!

दिल्लीमध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली असून या भेटीविषयी राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये तासभर खलबतं झाली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असून त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. राज्यातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

 

भेटीमागच्या कारणाविषयी निरनिराळे दावे!

ही भेट दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेली नसून ती साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली आहे. त्यामुळे संकेतांनुसार शासकीय कार्यालयात झालेल्या भेटीत राजकीय चर्चा होत नाही. मात्र, दोन्ही नेत्यांची तासभर चर्चा झाल्यामुळे या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसेल, हे मानण्यास राजकीय विश्लेषक तयार नाहीयेत. विशेषत: या भेटीच्या आधीच पियुष गोयल यांची देखील शरद पवारासोबत भेट झाल्यानंतर पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे त्याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. नुकतीच पियुष गोयल यांची राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पियुष गोयल यांनी देशातील काही प्रमुख नेत्यांसोबतच शरद पवारांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती. आणि आता शरद पवारांनी पंतप्रधानांसोबत तासभर खलबं केल्यानंतर त्यातून वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

देशात २०१४ पासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. मात्र, २०१९ मध्ये राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामधल्या भेटीगाठी अगदीच कमी झाल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर या दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट झाली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा!

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा केली जात आहे. या मुद्द्यावरून स्थानिक भाजपाकडून देखील सातत्याने शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक शब्दांमध्ये टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये राष्ट्रपतीपदाविषयी देखील चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकासआघाडी सरकारला धोका?

दरम्यान, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या भेटीमागचं सर्वात मोठं कारण किंवा परिणाम हा राज्यातील महाविकासआघाडी सरकारला असलेला धोका असल्याचं बोललं जात आहे. भाजपाकडून २०१९ मध्ये देखील राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला होता. हा प्रयत्न ८० दिवसांचाच ठरला. मात्र, त्यानंतर देखील भाजपाकडून सातत्याने महाविकासआघाडी सरकार पडण्याचे दावे केले जात आहेत.

आगामी पावसाळी अधिवेशनाची पार्श्वभूमी?

अवध्या दोन दिवसांमध्ये संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये देशातील करोनाची परिस्थिती, फ्रान्समध्ये नव्याने सुरू झालेली राफेल कराराची चौकशी, देशातील लसीकरणाची अवस्था या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसारख्या ‘जाणत्या’ नेत्यासोबत चर्चा करण्याची ही रणनीती असू शकते, असा एक मतप्रवाह राजकीय वर्तुळात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:38 pm

Web Title: ncp chief sharad pawar meets pm narendra modi in delhi political analysts in abuzz pmw 88
Next Stories
1 सोशल मीडियावरील खोट्या माहितीमुळे लोकांचा मृत्यू होतोय; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फेसबुकवर संतापले
2 “…आता सर्वोच्च न्यायालयही देशद्रोहींसोबत आहे का?” संजय निरुपम यांचा खोचक सवाल!
3 “पदवी देण्याआधी हुंडा घेणार नाही अशा बॉन्डवर विद्यार्थ्यांकडून सही करुन घ्या”; राज्यपालांची सूचना
Just Now!
X