गेल्या अनेक वर्षांपासून भारत देश ज्याची वाट पाहत होता ते राफेल विमान अखेरीस भारताच्या ताब्यात आलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राफेल विमानाची दसऱ्याच्या मुहुर्तावर विधिवत पुजा करण्यात आली. यादरम्यान राजनाथ सिंह यांनी विमानावर ॐ लिहीत विमानाच्या चाकांखाली लिंब ठेवली होती. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर अनेकांनी याच्यावर टीका केली.

सरकार राफेलसारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानाला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेत असताना अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याची टीका केली. महाराष्ट्राचे विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनीही राफेल विमानाच्या पुजेवरुन केंद्र सरकारला उपरोधिक टोला लगावला आहे.

सर्व वशीकरण स्पेशालिस्ट आणि तांत्रिक भाजपच्या चमूमध्ये दाखल झाले असल्यामुळे आपल्या देशाला आता कोणाचीच नजर लागणार नाही, असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसंच मोदींनी या प्रकरणी अनिल अंबानी यांना ३० हजार कोटींचा फायदा करुन दिला असाही आरोप केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्र सरकारने राफेल घोटाळा केला हा आरोप विरोधक आणि राहुल गांधी सातत्याने करत राहिले. संसदेबाहेर आंदोलनंही करण्यात आली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट विरोधकच या आरोपांवरुन तोंडघशी पडले. भाजपाला ३०३ जागा मिळाल्या आणि प्रचंड बहुमातने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. एकूण ३६ राफेल विमानं फ्रान्स भारताला देणार आहे. यासंदर्भातला करार झाला आहे. या करारातले पहिले विमान भारताला सुपूर्द करण्यात आले.