काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी रस्त्याने चालत जाणाऱ्या मजुरांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान यावरुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संताप व्यक्त केला होता. तसंच रस्त्यावर बसून मजुरांशी गप्पा मारण्याची ही वेळ आहे का? असा सवालही केला आहे. रस्त्यावर बसून गप्पा मारण्यापेक्षा त्यांच्या सुटकेस, बाळाला हातात उचलून घेऊन चालत गप्पा मारायला हव्या होत्या असं सांगताना हे नाटक नाही का ? अशी विचारणाही त्यांनी केली. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. “जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामेबाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे. माणुसकी इथे व्यक्त होतेच,” असं ते म्हणाले.

“स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे, त्यांच्या बरोबर चालणे ही राहुल गांधींची ड्रामेबाजी आहे असे निर्मला सीतारामन यांचे म्हणणे आहे. जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामेबाजी आहे, तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे. माणुसकी इथे व्यक्त होतेच,” असं आव्हाड म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून त्यांच्यावर निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवरुन टीका केली आहे. सरकारने सावकाराप्रमाणे वागू नये असं त्यांनी म्हटलं होतं. “ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे तिथे त्यांनी अजून ट्रेन मागवाव्यात आणि तेथील स्थलांतरित मजुरांना मदत करावी. दु:खी मनाने पायी चालत असताना त्यांच्यासोबत गप्पा मारत त्यांचा वेळ वाया घालवत बसले आहेत. त्यापेक्षा त्यांच्यासोबत चालत जा. त्यांच्या मुलांना उचलून, सुटकेस सोबत घेऊन गप्पा मारत चालत जायचं होतं. काँग्रेस आम्हाला नाटकी म्हणतं. पण मग मजुरांसोबत रस्त्यावर बसून गप्पा मारण्याची ती वेळ होती का. ते नाटक नाही का ?,” असं काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या.

“मला विरोधी पक्षांना आवाहन करायचं आहे की, स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केलं पाहिजे. आम्ही सर्व राज्यांसोबत या मुद्द्यावर चर्चा करत असून लक्ष ठेवून आहोत. सोनिया गांधी यांना हात जोडून मी विनंती करते की, आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोललं आणि वागलं पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं होतं.