राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून विरोधकांकडून पाठिंबा मिळेल अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पवार भाजपाविरोधी गटाचं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रतिनिधित्व करतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात उधाण आलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत शरद पवार राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आहेत का यासंदर्भात भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> …म्हणून मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही; पवारांचं सूचक वक्तव्य

कालपासून माध्यमातून शरद पवार राष्ट्रपती होणार असल्याच्या बातम्या येत असून त्याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्याची माहिती मलिक यांनी दिली. सध्या राष्ट्रपती पदाची निवडणूक नाही. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काय परिस्थिती असेल ते स्पष्ट होईल. मात्र राष्ट्रपती पदाबाबत पक्षांतर्गत कधीही चर्चा झाली नाही किंवा इतर पक्षांसोबतही चर्चा झालेली नाही. या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

पवारांनाही दिला नकार…

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाकडे बहुमत असल्याचे स्पष्ट संकेत देत पवारांनी आपण उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. “राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मी उमदेवार असेल हे पूर्णपणे खोटं वृत्त आहे. एका पक्षाकडे ३०० हून अधिक खासदार असताना याचा (राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा) निकाल काय असणार आहे मला ठाऊक आहे. मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार नसेन,” असं पवारांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकींबद्दलही पवार यांनी खुलासा केलाय. प्रशांत किशोर यांनी दोन वेळा माझी भेट घेतली. मात्र त्यावेळी आम्ही केवळ त्यांच्या कंपनीबद्दल बोललो. २०२४ च्या निवडणुकींमध्ये किंवा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकींमध्ये नेतृत्व कोणाकडे असावं यासंदर्भात आमची चर्चा झाली नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं. तसेच प्रशांत किशोर यांनी आपण निवडणुकीच्या नियोजनासंदर्भातील क्षेत्र सोडल्याचंही मला सांगितल्याचं पवार म्हणाले.

निवडणुकींसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचंही पवारांनी सांगितलं. २०२४ ची निवडणूक असो किंवा राज्यामधील निवडणूक असून अद्याप कशासंदर्भात काहीही निर्णय झालेला नाही. निवडणूक अजून फार दूर आहे आणि राजकीय परिस्थिती बदलत राहते. २०२४ मध्ये नेतृत्व कोणाकडे असेल यासंदर्भात मी कोणतेही अंदाज बांधणार नाही, असं पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शरद पवरांनी दिलेल्या या स्पष्टीकरणांमुळे सध्या तरी पवार राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवतील किंवा ते राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं चित्र दिसत आहे.