“भारतानं हवाई दलात राफेल विमानं सामिल केली ही नक्कीच चांगली बाब आहे. राफेलच्या ताफ्यात सामिल होण्यानं नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. भारतानं ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमानं भारताला मिळाली आहेत. राफेलच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्यानं चीनची चिंता वाढेल, असं वाटत नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. सीएनएन न्यूज १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

“आपण नक्कीच चीनसोबत असलेल्या तणावावर गंभींरपणे विचार करत आहोत. राफेलच्या येण्यानं चीनला कदाचित कोणतीही काळजी वाटणार नाही. ते आपल्यापासून खुप म्हणजे खुपच पुढच्या टप्प्यावर आहेत. आपल्यात आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नाही,” असं शरद पवार यावेळी म्हणाले. “जर भारतानं सुरक्षेच्या दृष्टीनं १० गोष्टी केल्या तर चीन १ हजार गोष्टी करेल. चीन आणि भारतात एवढी तफावात आहे. राफेलच्या येण्यानं चीनला त्याची काळजी वाटेल असं मला वाटत नाही. भारतानं राफेल हवाई दलात सामावून घेतलं आहे हे चांगलं आहे. त्यामुळे हवाई दलाची ताकद नक्कीच वाढणार आहे. पण ते गेमचेंजर ठरेल असं वाटत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“१०० टक्के राफेलसाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला होता आणि १०० टक्के भाजपानं त्यापर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे त्यात श्रेयवादाचा कोणता प्रश्नच उद्धभवत नाही,” असंही पवार राफेलच्या सुरू असलेल्या श्रेयवादावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

पाहा फोटो >> एरियल री-फ्युएलिंग : ३० हजार फुटांवर राफेलमध्ये भरलं इंधन; पाहा थक्क करणारे फोटो

राम मंदिरावरही भाष्य

“राम मंदिराला माझा मुळीच विरोध नाही. राम मंदिर त्या जागी व्हावं अशी संमती सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. अशावेळी विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर मान्यवर जात आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. अयोध्येतल्या जागेवर राम मंदिर उभं राहतंय ही देखील आनंदाची बाब आहे. मात्र मी त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळ्याला जाणार नाही. त्या सोहळ्यापेक्षा मला करोनामुळे महाराष्ट्रात जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते महत्त्वाचे वाटतात,” असं शरद पवार यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे जर भूमिपूजन सोहळ्याला गेले तर? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. “उद्धव ठाकरे जर राम मंदिराच्या भूमिपूजनाला गेले तर काहीही हरकत नाही. त्यांनी जरुर जावं, मात्र महाराष्ट्रातला प्रश्न महत्त्वाचा आहे असं त्यांना वाटलं आणि ते गेले नाहीत तरीही आमचं काहीही म्हणणं नाही,” असंही या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.