08 July 2020

News Flash

कर्जमाफीच्या मुद्द्यावर आता शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीला

शरद पवारांनी मोदींकडे मांडली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची व्यथा

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रातल्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आता राष्ट्रीय स्तरावरही चर्चेला येतो आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातलं शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्यांच्या वेदनेतून उभं राहिलं आहे. त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही, असं शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. तसंच शेतकरी
आंदोलनात पोलीस बळाचा वापर केला जातोय, हे किती योग्य आहे? असाही प्रश्न शरद पवार यांनी मोदी यांना विचारला आहे. आंदोलक शेतकऱ्यांवरचे गुन्हे तातडीनं मागे घ्यावेत अशीही मागणी शरद पवारांनी केली आहे.

देशभरात दरवर्षी १२ हजार शेतकरी आत्महत्या करतात अशी सुप्रीम कोर्टाची आकडेवारी आहे. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्र, तेलंगण आणि कर्नाटकमध्ये होतात. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता केंद्रानं तोडगा काढावा अशीही मागणी पवारांनी केलीये. तसंच तीन वर्षे झाली तरीही विद्यार्थी अभ्यासच करतो आहे असा टोला शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कर्जमाफीचा मुद्दा गाजतो आहे. राजू शेट्टी यांचं आंदोलन असेल, शिवसेनेची शेतकऱ्यांसाठीची अगतिकता आणि आग्रही भूमिका असेल किंवा विरोधकांनी सरकारविरोधात काढलेली संघर्ष यात्रा. सगळ्यांनीच शेतकरी कर्जमाफीसाठी एकत्र येत सरकारविरोधात भूमिका घेतली. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. ज्याला उत्तर देण्यासाठी सरकारनंही शिवार संवाद यात्रा काढली. ज्या दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तूर खरेदी संदर्भातल्या वक्तव्याचे पडसादही राज्यभरात उमटले. या सगळ्या घटनांना आळा बसावा आणि शेतकऱ्यांबाबत केंद्र आणि राज्य सरकारनं ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे.
१ जूनला शेतकरी संपावर गेले. सुरूवातीला पुणतांब्याच्या शेतकऱ्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही झाला. तरीही पुणतांब्यासह राज्यातले सगळेच शेतकरी संपावर गेले. राज्यातल्या शेतकऱ्यांनी संप पुकारल्यावर शहरांची कशी अवस्था झाली हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी घेतलेली पंतप्रधानांची भेट महत्त्वाची ठरते. राज्यातला शेतकरी वैतागला आहे. कर्जमाफी नाही, पाऊस नाही, कधी अवकाळीचं संकट, अशा सगळ्या संकटांच्या मालिका त्याच्यासमोर उभ्या आहेत. अशातून बाहेर पडण्याऐवजी शेतकरी मृत्यूला कवटाळतो आहे. ही स्थिती भीषण आहे. शेतकऱ्याच्या या वेदनेतून हा संप उभा राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकरी राज्यात संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही स्थिती सरकारसाठी चांगली नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलंय.
आजच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन लवकर कर्जमाफी देण्यात येईल अशी घोषणा केलीये. तसंच ही कर्जमाफी सर्वात मोठी असेल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2017 4:23 pm

Web Title: ncp president sharad pawar meet pm narendra modi
Next Stories
1 मोदी सरकार टीव्ही पे हिरो, जमीन पे झिरो- काँग्रेस
2 कॉल सेंटर घोटाळा: अमेरिकेतील खटल्यात ४ भारतीय, एक पाकिस्तानी दोषी
3 मोदींच्या कार्यकाळात फक्त अंबानी, अदानींचा विकास; भाजप आमदाराचा घरचा आहेर
Just Now!
X