गुजरातमध्ये राज्यसभेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीला पंधरा दिवसांचा अवधी असतानाच राष्ट्रवादीनं नेतृत्त्वात बदल केला आहे. राष्ट्रवादीचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष शंकरसिंह वाघेला यांना पदावरून दूर करण्यात आलं असून, माजी आमदार जयंत पटेल यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

१९ जून रोजी गुजरातमध्ये राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीचे पक्ष नेतृत्वामध्ये आणि प्रदेशाध्यक्ष शंकरसिंह वाघेला यांच्यात एका आमदाराच्या पाठिंब्यावरून मतभेद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जाात आहे. या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देण्याबद्दल वाघेला हे आग्रही होते. त्यावरूनच मतभेद झाल्याचं बोललं जात आहे.

राज्यसभेच्या चार जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपानं तीन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर काँग्रेसनं पक्षाचे ज्येष्ठ नेते शक्तीसिंह गोहिल व भारतसिंह सोळंकी यांना उमेदवारी दिली आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एकच आमदार असून, हे मत कुणाला असेल याबाबत अद्यापही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

नेतृत्व बदलाविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल यांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला. “पक्षानं प्रदेशाध्यक्ष बदलाचे आदेश पाठवले आहे. उद्या शंकरसिंह वाघेला यांच्याकडून पदाची सूत्रे घेईल. अचानक नेतृत्त्वा बदलाच्या निर्णयाविषयी पटेल म्हणाले,”पक्षानं शंकरसिंह वाघेला यांच्याकडील नेतृत्त्व दुसऱ्याकडे देण्याचा निर्णय घेतला. वाघेला हे दीड वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत होते,” असंही पटेल यांनी सांगितलं. जयंत पटेल हे आनंद जिल्ह्यातील उमरेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

पक्षातील बदलाविषयी बोलताना वाघेला म्हणाले,”मी पक्षाचा राष्ट्रीय महासचिव पदावरून काम करतच राहणार आहे. मी गुरूवारी एक पत्रकार परिषद बोलवणार आहे. तोपर्यंत मला काहीही बोलायचं नाही,” असं वाघेला यांनी सांगितलं.

गुजरातमधील कांधल जाडजा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सध्या महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेससोबत सरकारमध्ये आहे. तर युपीए सरकारमध्येही सहभागी होती. असं असलं तरी अद्याप राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं मत काँग्रेसलाच असणार का याबद्दल अजूनही स्पष्टता करण्यात आलेली नाही.