आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागाजिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बडय़ा मोहऱ्यांना पणाला लावण्याचे ठरविले आहे. राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवून आपले संख्याबळ वाढविण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी येत्या २७ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे.
महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसविषयी नकारात्मक वातावरण आहे, पण सोळाव्या लोकसभेत आपला पक्ष संख्याबळाच्या बाबतीत दुहेरी अंक गाठेलच, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे. राष्ट्रवादीचे किमान बारा खासदार निवडून येतील, असा दावा आज पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला. सोळाव्या लोकसभेत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए किंवा भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता धूसर असल्यामुळे प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत धर्मनिरपेक्ष तिसऱ्या आघाडीची केंद्रात सत्ता येण्याची संधी आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन प्रसंगी शरद पवार यांना पंतप्रधानपदावर दावेदारी सांगता यावी म्हणून राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली असून, लोकसभेच्या जास्तीत जास्त जागाजिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात काँग्रेसशीच युती करण्याचे ठरविले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी राज्यातील ४८ पैकी २२ जागा सोडल्या होत्या. यंदाची त्याची पुनरावृत्ती झाल्यास २२ पैकी जमेल तितक्या जागाजिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राज्य मंत्रिमंडळातील छगन भुजबळ, गणेश नाईक, जयंत पाटील, सुनील तटकरे, जयदत्त क्षीरसागर, बबनराव पाचपुते, हसन मुश्रीफ या बडय़ा मोहऱ्यांना पणाला लावण्याची शक्यता आहे. गेल्या १०-१५ वर्षांपासून राज्य मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांना यंदा लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा विचार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यापूर्वी दिल्लीत पत्रकारांशी बोलून दाखविला होता. आता या रणनीतीवर गहन विचार करण्यासाठी येत्या २७ एप्रिल रोजी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिली.
जून १९९९ मध्ये जन्माला आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत लोकसभेच्या तीन निवडणुका लढल्या आहेत. १९९९ साली स्वबळावर लोकसभेच्या ६ जागाजिंकणाऱ्या राष्ट्रवादीने काँग्रेसशी युती करून २००४ साली नऊ, तर २००९ साली आठ जागाजिंकल्या होत्या. आता मात्र कुठल्याही परिस्थितीत १२ किंवा त्यापेक्षा जास्त जागाजिंकण्याचे उद्दिष्ट राष्ट्रवादीने ठेवले आहे.