राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए)अध्यक्षपद सोपवण्यावरुन अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशात विरोधी पक्ष खिळखिळा असून युपीए मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावं अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान शऱद पवार यांनी युपीए अध्यक्षपदावरुन महत्वाचं भाष्य केलं आहे.

दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते विरोधी नेत्यांची भेट घेतील. दरम्यान शरद पवार यांनी दिल्ली दौऱ्याआधी न्यूज १८ शी बोलताना युपीए अध्यक्षपदासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांनी युपीए अध्यक्षपदी विराजनमान होण्याचं वृत्त फेटाळलं आहे.

आणखी वाचा- शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष? पी चिदंबरम यांची महत्वाची प्रतिक्रिया; म्हणाले…

“माझ्याकडे युपीए अध्यक्ष होण्यासाठी वेळ किंवा तसा विचार नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच येत नाही,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी याआधीदेखील युपीए अध्यक्ष होण्याचं वृत्त फेटाळलं होतं. प्रसारमाध्यमांशी बोलताना शऱद पवार यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं बोकं. “ही बातमी तुम्ही दिली आहे, अशा खोट्या बातम्या देऊ नका,” असं शरद पवार यांनी प्रसारमाध्यांना उद्देशून म्हटलं होतं.

संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे-
“देशात विरोधी पक्ष खिळखिळा असून संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए )मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावं,” अशी भूमिका शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मांडली. “शरद पवार यांच्याकडे यूपीएचे नेतृत्व सोपविल्यास शिवसेनेसह रालोआतून (एनडीए) बाहेर पडलेल्या पक्षांसह देशभरातील भाजपविरोधातील पक्षही यूपीएमध्ये सहभागी होण्याचा विचार करतील,” असं प्रतिपादन राऊत यांनी केले.

आणखी वाचा- “…त्यामुळे शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये”; काँग्रेसनं सुनावलं

निरुपम यांचे प्रत्युत्तर –
“काँग्रेस पक्षाला दुगणे देत शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावे ही शिवसेनेची मागणी महाविकास आघाडी सरकारच्या मुळावर येऊ शकते. कारण शिवसेनेने सातत्याने काँग्रेसवर टीकाटिप्पणी केल्यास काँग्रेस नेतृत्वाकडून पाठिंब्याबाबत फेरविचार होऊ शकतो. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेला चिंता असली तरी शिवसेना या आघाडीत आहेच कुठे?,” असा सवाल काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केला.