अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन धागे उलगडले जात आहेत. या प्रकरणाचा एकीकडे सीबीआय तपास सुरु आहे. तर दुसरीकडे सुशांतच्या जवळील व्यक्ती रोज त्याच्याशी निगडीत गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहेत. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. “सुशांत जिंवत असताना जेवढा प्रकाशझोतात नव्हता तेवढा तो मरणोत्तर आला आहे,” असं ते म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्टीकरण देत त्यांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नसून त्यांचं वैयक्तिक मत होतं असं सांगण्यात आलं आहे.

“ट्विटरवर मजिद मेमन यांनी केलेले वक्तव्य हे राष्ट्रवादीचे नव्हे तर त्यांचं वैयक्तिक मत आहे. आमचा पक्ष कोणत्याही स्वरूपाने किंवा पद्धतीने त्यांच्या विधानास पाठिंबा देत नाही किंवा समर्थन देत नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे,” असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

आणखी वाचा- “सुशांत जिवंत असताना जितका प्रकाशझोतात नव्हता तितका मरणोत्तर आला”

काय म्हणाले होते मेमन?

“सुशांत जिंवत असताना जेवढा प्रकाशझोतात नव्हता तेवढा तो मरणोत्तर आला आहे. आजकाल त्याला माध्यमांमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यापेक्षा अधिक माध्यमांवर त्याची अधिक चर्चा आहे,” असं मेमन म्हणाले. “ज्या वेळी कोणत्याही गुन्ह्याचा तपास सुरू असतो त्यावेळी त्याबद्दल माहिती गोपनीय ठेवणं आवश्यक असतं. कोणत्याही प्रकारची माहिती सार्वजनिक केल्यानं न्यायावर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो,” असंही ते म्हणाले.