देशात बेरोजगारीचा प्रश्न शिगेला पोहचला आहे त्याचमुळे दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ असे म्हणणाऱ्या मोदी सरकारचे नाक कापले गेले आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने एका ट्विटच्या माध्यमतातून केली आहे. 45 वर्षातली बेरोजगारी या सरकारच्या कार्यकाळात आल्याचे सांख्यिकी अहवाल सांगतो असेही राष्ट्रवादीने ट्विटमध्ये म्हटले आहे. या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून जे नाक कापले गेले ते अर्थसंकल्पाच्या सर्जरीने जोडल्याचा खोचक ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडला. शेतकरी, कामगार आणि मजूर वर्ग तसेच मध्यमवर्गीय नोकरदार यांच्यासाठी मोदी सरकारने अनेक घोषणा केल्या. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने अर्थसंकल्पातल्या तरतुदी जाहीर केल्या अशी टीका विरोधक करत आहेत. तर मोदी सरकारने एक चांगला आणि लोककल्याणकारी अर्थसंकल्प जाहीर केला असे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात मोदींची दोन चित्रं आहेत. पहिल्या चित्रात बेरोजगारीच्या मुद्द्यावरू नाक कापले गेल्याचे दाखवण्यात आले आहे. तर दुसऱ्या चित्रात अर्थसंकल्पाच्या सर्जरीने कापलेले नाक जोडले गेले असे दाखवण्यात आले आहे.

भाजपाला झोंबणारे व्यंगचित्र राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केले आहे. त्यामुळे आता यावर भाजपाकडून काय उत्तर दिले जाणार ते पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.