गेल्या महिन्यात राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला सोडून भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमधील आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सौराष्ट्र विभागातील सर्व ५८ जागा लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. यानंतर लवकरच इतर तीन विभागातील जागा जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पटेल यांनी ही माहिती दिली. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.

पटेल म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि बेरोजगारी हा या निवडणुकीतील आमचा प्रचाराचा मुद्दा असणार आहे.

सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमध्ये प्रामुख्याने पाटीदार समाजाची लोकसंख्या मोठी आहे. आपल्याला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी या समाजाने मोठे आंदोलन छेडले होते. मात्र, याठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होणार नसल्याने त्याचा फायदा भाजपला होणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील एकूण १८२ जागांपैकी जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी शरद पवारांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. २०१२ मध्ये झालेल्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे केवळ ९ उमेदवारच येथे निवडून आले होते.

या निवडणुकीत राज्यसभेसाठी भाजपला मत देणारे कंधाल जडेजा या राष्ट्रवादीच्या आमदाराला पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. जडेजा यांनी राज्यसभेसाठी काँग्रेसला मत दिल्याचा आरोप जयंत पटेल यांनी केला होता. तर पवार यांच्या सांगण्यानुसार जडेजा यांनी आम्हालाच मत दिल्याचा दावा भाजपने केला होता.