पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकवटलेल्या जनता परिवारात खडाखडी न होता जागावाटप झाले असताना भाजपला मात्र सहकारी पक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत जागावाटपासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेली बैठक आज कोणत्याही निर्णयाविना गुंडाळण्यात आली. तब्बल नव्वद मिनिटांच्या या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी पत्रकारांशी बोलताना जागावाटपावरून कोणताही मतभेद नसल्याचा दावा केला. रामविलास पासवान, माजी मुख्यमंत्री जतीनराम मांझी रालोआत सामील झाल्याने महादलितांच्या मतांवर आतापासूनच भाजपने दावा ठोकला आहे. त्यामुळे पासवान, मांझी व राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह यांनी भाजपकडे एकूण १४२ जागांची मागणी केली आहे. हे समीकरण मान्य केल्यास भाजपला केवळ १०१ जागी समाधान मानावे लागेल. आजच्या बैठकीत हा प्रस्ताव या नेत्यांनी शहा यांच्यासमोर ठेवला आहे.
या बैठकीत रालोआच्या घटक पक्षांच्या नेत्यांसह बिहार प्रभारी भूपेंदर यादव, सुशीलकुमार मोदी, केंद्रीय मंत्री अनंतकुमार उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवतील तो उमेदवार मुख्यमंत्रिपदासाठी मान्य असल्याचा पुनरुच्चार पासवान यांनी केला. कुशवाह यांना ६७ जागा हव्या आहेत. हा प्रस्ताव भाजपने धुडकावून लावला आहे. कुशवाह यांना १८, पासवान यांच्या लोजपसाठी ४२ तर मांझी यांना केवळ २० जागा देण्याचा प्रस्ताव शहा यांनी दिला आहे. अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नितीशकुमार यांना भाजपने मुख्यमंत्रिपद दिले होते; तसेच ठोस आश्वासन मिळावे यासाठी कुशवाह प्रयत्नशील आहेत.
मांझींना राज्यपालपदाचे गाजर?
भाजपने जितनराम मांझी यांना राज्यपालपदाचे गाजर दाखविल्याची चर्चा दिल्लीत सुरू आहे. त्यामुळे मांझी जागावाटपात फारसे आढेवेढे घेणार नाहीत.

हार्दिक  डोकेदुखी ठरणार!
गुजरातमध्ये पेटलेल्या पाटीदार आरक्षण आंदोलनाचा ‘हिरो’ हार्दिक पटेल याच्यामुळे भाजप गोटात चिंतेचे वातावरण आहे. हार्दिक पटेल याने नितीशकुमार यांना साद घातल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. हार्दिक पटेल याच्या नेतृत्वात पटेल समाजाने छेडलेल्या आंदोलनावर रालोआच्या बैठकीत चर्चा झाली.