देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटताना दिसत आहे. थंडीच्या लाटेतही शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं असून, असंच चित्र राज्यांच्या राजकीय वर्तुळातही दिसत आहे. उद्या (८ डिसेंबर) होणाऱ्या भारत बंद आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला असून, याच मुद्यावरून एनडीएतील मित्रपक्ष असलेला राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी भाजपापासून फारकत घेण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी दिली आहे.

मोदी सरकारने पावसाळी अधिवेशनात तीन कृषी विधेयक मंजूर करून घेतली होती. या विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं असून, या कायद्यांना शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात सरकारकडून चर्चा सुरू आहे. मात्र, अद्यापही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी उद्या (८ डिसेंबर) भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून, राजस्थानातील भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीनं कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.

आरएलपीचे (राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी) अध्यक्ष व खासदार हनुमान बेनीवाल यांनी माध्यमांशी बोलताना एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं? याविषयी ८ डिसेंबरला निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. “राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचा शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा आहे. पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत. एनडीएसोबत राहायचं की नाही, याचा निर्णय ८ डिसेंबरला घेणार आहोत,” असं बेनीवाल यांनी सांगितलं.

राजस्थानमध्ये आरएलपी भाजपाचा मित्रपक्ष असून, एनडीएसोबत आहे. आरएलपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास भाजपापासून आणखी एक मित्रपक्ष दूर जाणार आहे. कृषी विधेयकाच्या मुद्यावरूनच काही दिवसांपूर्वीच पंजाबमधील शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडला आहे.