राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) देशातील एक मोठा राजकीय गट मानला जातो. मात्र, दोन दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर व मागील महिन्यात पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाने एनडीएची साथ सोडल्यानंतर आता केंद्रीय कॅबिनेटमधील जवळपास सर्वच जागी भाजपाचे मंत्री आहेत. आता केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ एकच गैरभाजपा मंत्री उरले आहेत, ते म्हणजे आरपीआयचे प्रमुख केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. त्यामुळे ‘रालोआ’चं मंत्रिमंडळ आता शतप्रतिशत भाजपा असं संबोधलं तर वावगं ठरणार नाही.
१९७७ पासून हे पहिल्यांदाच घडले आहे, की आघाडी सरकारमधील सर्व कॅबिनेट मंत्री हे एकाच पक्षाचे आहेत.२०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर अनेक राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएने कॅबिनेटमध्ये सहकारी पक्षांना तीन स्लॉट दिले होते. तर सुरूवातीपासूनच आपल्या १५ सदस्यांसह एनडीए आघाडीत सहभागी झालेल्या जदयूने मंत्रिमंडळाच्या बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर केंद्रीयमंत्री मंडळात शिवसेनेचे अरविंद सावंत हे अवजड उद्योगमंत्री बनले, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांच्याकडे अन्न प्रकिया उद्योगमंत्री म्हणून जबाबदारी होती. तर, लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान यांना केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व वितरण मंत्री बनवण्यात आले होते.
मात्र महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या संघर्षातील राजकीय नाट्यानंतर शिवसेनेचे केंद्रीय मंत्रीमंडळातील प्रतिनिधी अरविंद सावंत यांनी मागील वर्षी राजीनामा दिला. त्यानंतर मागील महिन्यात कृषी विधेयकास विरोध करत हरसिमरत कौर बादल यांनी देखील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिवाय, त्यांचा पक्ष अकाली दलाने देखील एनडीएची साथ सोडली. आता प्रदीर्घ आजारानंतर लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान यांचा मृत्यू झाल्याने भाजपाचा आणखी एक सहकारी पक्ष केंद्रीय मंत्रिमंडळातून कमी झाला. त्यामुळे आता केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले हे एकमेव गैरभाजपा मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात उरले आहेत.
मागील काही महिन्यांपासून पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या देखील समोर येत आहेत. मात्र, त्याबद्दल सध्यातरी कुठलीही घोषणा झालेली नाही. नवरात्रोत्सव काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीमुळे हे लांबणीवर पडल्याचं दिसत आहे. आता बिहार निवडणुकीनंतरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारास मुहूर्त लागण्याची शक्यता दिसत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 2:49 pm