जहाज आणि महामार्ग क्षेत्रात सहा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेण्याची योजना असून त्याद्वारे ५० लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास सरकार बांधील असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे भारत आणि श्रीलंका यांच्यातील संपर्क यंत्रणेसाठी २२ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची आखणी सुरू असून त्यासाठी आशियाई विकास बँकेने निधी उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असेही गडकरी म्हणाले.
महामार्ग क्षेत्रात पाच लाख कोटी रुपयांची तर जहाज क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांची कामे करण्याचे आम्ही ठरविले आहे. पुढील पाच वर्षांत आम्ही देशातील किमान ५० लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, असे गडकरी यांनी महामार्गाशी संबंधित एका परिषदेच्या वेळी सांगितले.
गेल्या वर्षांपासून महामार्ग आणि जहाज क्षेत्र यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे, असेही गडकरी म्हणाले. शेजारी देशांशी संपर्क यंत्रणा विकसित व्हावी याचाही सरकार प्राधान्याने प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीलंकेशी संपर्क यंत्रणा निर्माण करण्याच्या प्रकल्पावर काम सुरू आहे आणि ती पूर्ण झाल्यावर ट्रान्स एशिया रोड अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट प्रणाली श्रीलंकेपर्यंत विस्तारित करता येणार आहे. पूल आणि पाण्याखालील बोगदा असा हा प्रकल्प असून त्यामुळे जहाजांची वाहतूक सुरळीत होईल, असेही त्यांनी सांगितले.