मोदी सरकारविरोधात टीडीपीने आणलेला अविश्वास प्रस्ताव अपेक्षेप्रमाणे सरकारने जिंकला. अविश्वास प्रस्ताव जिंकल्यानंतर काही क्षणांतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्याकडे केवळ सभागृहाचाच नव्हे तर १२५ कोटी जनतेचाही विश्वास आहे, अशी विजयी प्रतिक्रिया दिली. ट्विटरद्वारे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

”एनडीए सरकारकडे लोकसभेसह १२५ कोटी जनतेचाही विश्वास आहे. मतदानामध्ये आम्हाला साथ देणाऱ्या सर्वच पक्षांचे आभार मानतो. भारताला बदलण्याची आणि तरुणांची स्वप्न पूर्ण करण्यासाठीची आमची मेहनत अशीच सुरू राहिल…जय हिंद”, असं ट्विट त्यांनी केलं.

लोकसभेत जवळपास १२ तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर घेण्यात आलेल्या मतदानादरम्यान केंद्रातील मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर एकूण ४५१ सदस्यांनी मतदान केले. प्रस्तावाच्या विरोधात एकूण ३२५ मते पडली, तर प्रस्तावाच्या बाजूने १२६ मतांची नोंद झाली. प्रस्तावावर मतदान झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले. हा प्रस्ताव आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आला होता. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले होते.