देशभरात जर आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली आणि काँग्रेसने सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी केली तर भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळणार नाही. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने ‘मूड ऑफ द नेशन’ नावाने एक सर्व्हे केला आहे. देशातील तीन राजकीय परिस्थितींवर आधारित सर्व्हेचा रिपोर्ट नुकताच जारी करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सात महिनेआधी करण्यात आलेल्या या सर्व्हेत काँग्रेस आणि युपीएची फक्त मतदान टक्केवारी नाही तर २०१४ च्या तुलनेत जागाही वाढताना दिसत आहेत.

जर २०१४ प्रमाणे राजकीय परिस्थिती असेल तर एनडीएसा २८१ जागा मिळू शकतात तर युपीएला १२२ जागा आणि इतरांना १४० जागा मिळू शकतात. मतदान टक्केवारीबद्दल बोलायचं झाल्यास अशा परिस्थितीत एनडीएला ३६ टक्के, युपीएला ३१ टक्के आणि इतरांना ३३ टक्के मतं मिळू शकतात. माहितीसाठी, २०१४ मध्ये सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेस युपीएमध्ये सहभागी नव्हते. २०१४ मध्ये २३ पक्षांच्या एनडीए युतीला ३३६ जागा मिळाल्या होत्या. यामध्ये एकट्या भाजपाने २८२ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला फक्त ४४ जागा मिळाल्या होत्या. तर १२ पक्षांच्या युपीए आघाडीला फक्त ६० जागांवर विजय मिळाला होता. साडे चार वर्षांनंतर युपीए आघाडीला दुपटीने जागा मिळताना दिसत आहेत. तर एनडीएला ५५ जागांचं नुकसान होताना दिसत आहे.

दुसऱ्या राजकीय परिस्थितीनुसार, जर काँग्रेसप्रणीत युपीएने सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेसला सोबत घेतलं तर एनडीएची मतदान टक्केवारी कमी होणार नाही मात्र जागा कमी होऊन २२८ होऊ शकतात. याचा अर्थ एनडीएला एकूण १०८ जागांचं नुकसान होऊ शकतं. तर युपीएच्या जागा वाढून २२४ होऊ शकतात. सोबतच मतदान टक्केवारी वाढून ४१ टक्के होऊ शकते, म्हणजे युपीएला १६४ जागांचा फायदा होऊ शकतो. इतरांच्या खात्यात ९२ जागा आणि २३ टक्के मतं जाऊ शकतात. महत्वाचं म्हणजे एनडीए आणि युपीएमध्ये फक्त चार जागांचं अंतर राहत आहे. त्यामुळे लोकसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते.

तिसरी राजकीय परिस्थिती दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांच्या युतीवर आधारित आहे. सर्व्हेत सांगितल्यानुसार, जर एनडीएने तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमूक आणि आंध्र प्रदेशातील विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसला सोबत घेतलं आणि काँग्रेसने टीडीपी आणि जम्मू काश्मीरमधील पीडीपीला सोबत घेतलं तर एनडीएचा जागांचा आकडा २५५ पर्यंत पोहोचू शकतो. तसंच मतदान टक्केवारी ४१ टक्के होऊ शकते. अशा परिस्थितीत युपीएला २४२ जागा आणि ४३ टक्के मतं मिळू शकतात. इतरांना ४६ जागा आणि १६ टक्के मतं मिळू शकतात. अशा परिस्थितीतही लोकसभेत त्रिशंकू होईल.

सर्व्हेनुसार, पंतप्रधानपदासाठी अद्यापही नरेंद्र मोदींनाच जास्त पसंती मिळत आहे. ४९ टक्के मतांसहित नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय चेहरा ठरले आहेत. राहुल गांधींना २७ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. यावर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणूक होणार आहे. यामधील दोन राज्यांमध्ये काँग्रेस पुनरागन करेल असं सर्व्हेत म्हटलं आहे.di