तेजस्वी यांचा आरोप, काँग्रेसमध्ये तत्काळ आत्मचिंतन करण्याचा सूर

पाटणा ; राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांची गुरुवारी बिहारमधील महाआघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ‘लबाडीने’ ही निवडणूक जिंकल्याचा आरोप त्यांनी या निवडीनंतर लगेचच केला. तिकडे, काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीमुळे महाआघाडीचा सत्तेचा मार्ग अवरुद्ध झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, काँग्रेसने ‘सखोल आत्मचिंतन’ करावे, असा सूर पक्षातूनच उमटला आहे.

तेजस्वी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांची खिल्ली उडवली. नितीश हे आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जागून खुर्चीबद्दलची आपली आसक्ती सोडणार काय, असा प्रश्न त्यांनी विचारला.

तेजस्वी यांचे नाव मनी लाँडरिंगच्या एका प्रकरणात आल्यानंतर, २०१७ साली महाआघाडीसोबत संबंधविच्छेद करून नितीशकुमार हे रालोआत परत आले होते, त्याचा तेजस्वी यांच्या वक्तव्याला संदर्भ होता. आपण अंतरात्म्याचा आवाज मान्य करून पायउतार होत असल्याचे कुमार यांनी त्या वेळी म्हटले होते.

‘लोकांनी नक्कीच बदलासाठी मत दिले होते, पण राष्ट्रीय लोकशाही आघाडी धन, बळ आणि फसवणूक यांच्या मदतीने विजयी झाली,’ असा आरोप यादव यांनी केला.

दरम्यान, वाईट कामगिरी केल्यामुळेच आपला पक्ष साखळीतील कच्चा दुवा ठरला आणि पर्यायाने महाआघाडी राज्यात सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरली, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे सरचिटणीस तारिक अन्वर यांनी ट्विटरवर दिली. पक्षाच्या दारुण पराभवाबाबत ‘तातडीने व सखोल आत्मचिंतन’ आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

मांझी यांची निवड

बिहार विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एचएएम) चार आमदार निवडून आले असून त्यांनी गुरुवारी मांझी यांची एचएएम विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली.