चीनने २०१४ पासून आतापर्यंत शिनजियांग प्रांतातील दहशतवाद्यांच्या १५०० टोळया संपवल्या असून १३ हजार दहशतवाद्यांना अटक केली आहे. सोमवारी चीनकडून ही माहिती देण्यात आली. चीनने शिनजियांग प्रांतातील मुस्लिमांसाठी त्यांच्याकडून राबवल्या जाणाऱ्या वादग्रस्त सुरक्षा उपायोजनांचे समर्थन केले आहे. शिनजियांग प्रांतातील मुस्लिमांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आले त्यावरुन चीनवर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होत आहे.

संयुक्त राष्ट्राच्या मते ही एक प्रकारची नजरकैद आहे. मुस्लिमांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे तिथे त्यांना व्यवसाय शिक्षण दिले जाते. उपजिवीकेसाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते तसेच कट्टरपंथीय विचाराच्या प्रभावातून बाहेर काढण्याचे काम चालते असे चीनचे म्हणणे आहे.

मानवी हक्कांचे संरक्षण तसेच कट्टरपंथीय आणि दहशतवादाविरोधात लढा असे चीनने काढलेल्या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. २०१४ पासून शिनजियांगमध्ये १५९९ दहशतवादी टोळया संपवल्या असून १२,९९५ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून २०५२ स्फोटक उपकरणे जप्त केली असून ३०,६४५ लोकांना शासन केले आहे. बेकायदा धार्मिक साहित्याच्या ३ लाख ४५ हजार २२९ प्रती जप्त केल्याची माहिती चीनने दिली आहे.