गेल्या ११ वर्षात राजकीय पक्षांना मिळालेल्या एकुण उत्त्पन्नापैकी ६९ टक्के निधीचा स्त्रोत अज्ञात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २००४-०५ ते २०१४-१५ या कालावधीत राजकीय पक्षांना एकूण राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना ११, ३६७. ३४ कोटींच्या देणग्या मिळाल्या. मात्र, यापैकी ६९ टक्के म्हणजे ७,८३३ कोटींच्या देणग्या नक्की कुणी दिल्या याची माहितीच नसल्याचे दिल्लीस्थित ‘असोसिएनश फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्मस’ (एडीआर) या संस्थेच्या अहवालातून उघड झाले आहे. अशाप्रकारच्या अज्ञातमार्गाने उत्त्पन्न मिळालेल्या राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस आणि भाजप हे पक्ष आघाडीवर आहेत.

दरम्यान, राजकीय पक्षांच्या एकूण उत्पन्नापैकी ज्ञात स्त्रोतांकडून प्राप्त झालेल्या देणग्यांची रक्कम १,८५३.६३ कोटी म्हणजे १६ टक्के इतकी आहे. याशिवाय, राजकीय पक्षांना मालमत्तांची विक्री, सदस्यत्त्व शुल्क, बँकेतील ठेवींवर मिळणारे व्याज, प्रकाशनांची विक्री, पक्ष कर या माध्यमातून गेल्या ११ वर्षात १,६९८.७३ कोटी इतके उत्त्पन्न मिळाले आहे. ही रक्कम राजकीय पक्षांच्या एकूण उत्त्पन्नाच्या १५ टक्के आहे. एडीआरच्या अहवालानुसार, गेल्या ११ वर्षात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या एकुण उत्त्पन्नापैकी ८३ टक्के म्हणजे ३,३२३.३९ कोटी आणि भाजपच्या ६५ टक्के म्हणजे २,१२५.९१ कोटी उत्त्पन्नाचा स्त्रोत अज्ञात असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये अज्ञातमार्गाने सर्वाधिक उत्त्पन्न मिळालेल्यांमध्ये समाजवादी पक्ष आणि शिरोमणी अकाली दलाचा समावेश आहे. गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत समाजवादी पक्षाला मिळालेल्या एकूण उत्त्पन्नापैकी ९४ टक्के म्हणजे ७६६.२७ कोटी आणि शिरोमणी अकाली दलाचे ८६ टक्के उत्त्पन्न कुठून मिळाले, याची माहिती कळालेली नाही.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर राजकीय पक्षांच्या निधीच्या स्रोताची चौकशी करण्यासाठी एक आयोग नियुक्त करावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा करताना राजकीय पक्षांना प्रप्तिकर भरण्यात सवलत देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, राजकीय पक्षांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी कर कायद्यांमध्ये पुरेशी तरतूद आहे, असे केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.