माझ्या ७१ व्या वाढदिवशी देशात एकाच दिवसात २.५ कोटी लोकांना करोना प्रतिबंधक लसमात्रा  देण्यात आल्या हा भावोत्कट क्षण असून तो सदैव स्मरणात राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले आहे.

आरोग्य कर्मचारी व लस लाभार्थींशी आभासी पद्धतीने संवाद साधताना त्यांनी सांगितले, की आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून भारताने एक जागतिक विक्रम साध्य केला असून एकाच दिवशी २.५ कोटी लस मात्रा दिल्या आहेत. अनेक प्रगत देशांना जे जमले नाही ते भारताने करून दाखवले आहे. काल सगळ्यांच्या नजरा कोविन डॅशबोर्डकडे होत्या. शुक्रवारी २.५ कोटी लसमात्रा देण्यात आल्या याचा अर्थ तासाला १५ लाख, मिनिटाला २६ हजार, तर सेकंदाला ४२५ लसमात्रा देण्यात आल्या, असे सांगून ते म्हणाले की, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, प्रशासनातील लोक यांच्या प्रयत्नातून हे साध्य झाले आहे.

कुठल्याही पक्षाचे नाव न घेता मोदी यांनी सांगितले, की आपल्या वाढदिवशी २.५ कोटी लसमात्रा देण्याचा विक्रम झाल्याचे ऐकून एका राजकीय पक्षाला ज्वर चढला. लोक लशीनंतर येणाऱ्या तापाचा विचार करतात पण येथे राजकीय पक्षाला २.५ कोटी लसमात्रा देण्याच्या विक्रमामुळे ताप आला आहे!

या प्रकारचे यश मिळवण्यासाठी कुशल मनुष्यबळ लागते, इच्छाशक्ती लागते जी  भारतातील लोकांकडे आहे. वाढदिवस येतात व जातात, पण कालचा वाढदिवस सदैव स्मरणात राहील कारण त्यादिवशी २.५ कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. आपल्यासाठी हा अविस्मरणीय प्रसंग होता.

कुठल्याही पक्षाचे नाव न घेता मोदी यांनी सांगितले,की आपल्या वाढदिवशी २.५ कोटी लसमात्रा देण्याचा विक्रम झाल्याचे ऐकून एका राजकीय पक्षाला ज्वर चढला. लोक लशीनंतर येणाऱ्या तापाचा विचार करतात पण येथे राजकीय पक्षाला २.५ कोटी लसमात्रा देण्याच्या विक्रमामुळे ताप आला आहे. ते म्हणाले,की माझ्या मनातली गोष्ट सांगायची तर माझे अनेक वाढदिवस आले व गेले पण ते मी साजरे केले नाहीत. माझ्या संपूर्ण आयुष्यात कालचा दिवस हा भावोत्कट होता. वैद्यकीय क्षेत्रातील लोक दीड वर्षापासून लसीकरणाचे काम करीत आहेत पण २.५ कोटी लसमात्रा एकाच दिवशी देण्याचा योग आला. एक मात्रा एक जीव वाचवू शकते. देशात एक लाखाहून अधिक लसीकरण केंद्रे आहेत. त्यांनी यात काम केले. एका वयस्कर मित्राला फोन केला तेव्हा त्याने माझे वय विचारले,तर मी म्हटले आणखी अजून तीस वर्षे  बाकी आहेत.  गोवा, हिमाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यात पर्यटकांची संख्या जास्त आहे,त्यामुळे तेथे लसीकरणाचे काम वेगाने करावे म्हणजे पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. आपले पर्यटन क्षेत्र खुले होत आहे. गोव्याचे त्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. हॉटेल उद्योग, टॅक्सी चालक, दुकानदार यांचे लसीकरण करण्यात गोव्याला यश आले आहे. त्यामुळे तेथे प्रवास करताना सुरक्षित वाटते. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र असून तेथे प्रत्येकाला लस दिली आहे. करोना कमी होत आहे त्यामुळे लोक आता सुरक्षिततेकडे फार लक्ष देत नाहीत, पण लसीकरणाबरोबरच सामाजिक अंतर व मुखपट्टी अजूनही आवश्यक आहे. सरकारने आंतरराष्ट्रीय पर्यटन उद्योगाला उत्तेजन देण्यासाठी पाच लाख जणांना मोफत व्हिसा, आदरातिथ्य क्षेत्राला १० लाख रुपये कर्ज, पर्यटन क्षेत्रातील वाटाड्यांना १ लाख रु. कर्ज अशा उपाययोजना केल्या आहेत. या वेळी मोदी यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण काढली. ते जिवंत असते तर आज राज्यासाठी अभिमानास्पद ठरले असते. पर्रीकर  यांचा प्रगतीचा वारसा मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुढे नेत आहेत असेही ते म्हणाले.