29 January 2020

News Flash

देशात आणखी एक लाख मोबाइल टॉवर्सची गरज

आज देशात ३० हजार मोबाइल टॉवर्स पुन:परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

(संग्रहित छायाचित्र)

३० हजार टॉवर्स पुन:परवानगीच्या प्रतीक्षेत

जग ५जी तंत्रज्ञानाकडे वळत असताना आपल्याकडे होणारे कॉल ड्रॉपचे प्रमाण अधिक आहे. देशातील वाढत्या मोबाइल ग्राहकांना विनातक्रार सेवा पुरविण्यासाठी आणखी एक लाख नव्या मोबाइल टॉवर्सची आवश्यकता असल्याचे मत सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय)चे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी व्यक्त केले. याचबरोबर आज देशात ३० हजार मोबाइल टॉवर्स पुन:परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

देशात कॉल ड्रॉपचे प्रमाण असल्याचे मान्य करत मॅथ्यूज यांनी सरकारी मालकीच्या इमारतींवर मोबाइल टॉवर उभारण्यासाठी परवानगी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ते झाल्यास कॉलड्रॉपचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे. पण या प्रत्नांना अद्याप गती मिळत नसल्याचेही ते म्हणाले. याचबरोबर देशातील पुणे, दिल्ली, बंगळुरू, चंडिगढ यांसारख्या शहरांमध्ये बहुतांश जमिनी या संरक्षण खात्याच्या अखत्यारीत आहेत. या जमिनींवर काही कारणांमुळे टॉवर्स लावण्यास परवानगी देण्यात येत नसल्यामुळेही या भागांमध्ये कॉल ड्रॉपचे प्रमाण अधिक असते व त्या भागात आम्ही फोरजी, थ्रीजीसारख्या सुविधाही देऊ शकत नसल्याचेही ते म्हणाले. याबाबत सीओएआय आणि केंद्र सरकार यांच्यात बोलणे सुरू असून लवकरच या भागांमध्ये मोबाइल टॉवर्स बसवण्यासाठी परवानगी मिळणे अपेक्षित आहे. स्थानिक महापालिकांकडून रद्द होणारे मोबाइल टॉवर तसेच स्थानिक पातळीवर इमारतीच्या सोसायटीकडून विरोध होत आहे. ग्राहकसंख्या पाहता टॉवरसाठी परवानग्या आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. मुंबई पालिकेकडून १२० टॉवरची परवानगी रद्द करण्यात आली आहे. दिल्लीत ३००, तर ठाण्यात ३० टॉवरची परवानगी रद्द झाली आहे. अशा प्रकारे देशात एकूण ४० टक्के मोबाइल टॉवर्स परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

टू जी ग्राहकांसाठी केबलसारखे मॉडेल हवे

भारतात फोर जी तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास सुरुवात झाली असली तरी आजही फीचर फोन वापरणाऱ्यांचा टक्का सर्वाधिक आहे. देशातील एकूण एक अब्जाहून अधिक वापरकर्त्यांपैकी ७५ टक्के वापरकर्ते हे २जी तंत्रज्ञान वापरकर्ते ग्राहक आहेत. केबल डिजिटायजेशनसाठी ज्या पद्धतीने देशपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली. तशीच मोहीम सरकारी पातळीवर मोबाइल सेवा पुरवठादारांच्या मदतीने घेणे गरजेचे आहे. देशात मोबाइल वापरकर्त्यांमध्ये उर्वरित २५ टक्के लोक हे स्मार्टफोन वापरकर्ते आहेत. या स्मार्टफोन वापरकर्त्यां ग्राहकांपैकी ८० टक्के लोकच इंटरनेट डेटा वापरतात. भारतात इंटरनेट डेटा वापरणाऱ्यांकडून १२ टक्के ते १५ टक्के लोकांकडूनच इंटरनेट डेटा वापरला जातो. जगभरात ४५ टक्के इतक्या प्रमाणात इंटरनेट डेटा प्रति माणशी वापर आहे.

First Published on January 25, 2017 2:10 am

Web Title: need for one lakh mobile towers in india
Next Stories
1 टीपीपी करारातून अमेरिकेची माघार
2 भारतीय वंशाचे अजित पै अमेरिकेचे संचार आयोगप्रमुख
3 राजकीय पक्षांच्या ६९ टक्के उत्पन्नाचा स्त्रोतच माहित नाही
Just Now!
X