राफेल करारावरुन काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच हवाई दलाच्या प्रमुखांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे. मोदी सरकारच्या राफेल कराराचे समर्थन करतानाच राफेलमुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात भर पडेल, असा दावा भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी केला आहे.

बुधवारी दिल्लीत हवाईदलप्रमुख धनोआ यांनी एका कार्यक्रमात राफेल करारावर भाष्य केले. ते म्हणाले, जगात आपल्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागणारे देश खूप कमी आहेत. आपल्या दोन्ही बाजूला अण्वस्त्रधारी देश आहेत. त्यातुलनेत आपल्याकडील शस्त्रसाठा अपुरा आहे. अशा परिस्थितीत राफेल विमानांमुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात भरच पडेल, असे त्यांनी सांगितले.

राफेल लडाऊ विमाने तसेच रशियाकडून घेण्यात येणारी एस – ४०० ही अत्याधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली यासारख्या नवीन शस्त्रांमुळे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यामध्ये वाढ होईल. केंद्र सरकार हवाई दलाला राफेल विमाने देणार आहे. या विमानांमुळे हवाई दलाला सध्याच्या समस्यांवर मात करण्यास मदत होईल. या खरेदीमुळे भारतीय हवाई दलाकडे असणारी शस्त्रांची कमतरता बऱ्याच अंशी भरून निघेल असा विश्वासही धनोआ यांनी व्यक्त केला. सध्या भारतीय हवाई दलामध्ये ३१ लडाऊ तुकड्या आहेत. आणि आपल्याला ४२ तुकड्यांची गरज असल्याचे धनोआ यांनी सांगितले. मात्र ४२ तुकड्यांचा समावेश करण्यात आला तरीही आपण आपल्या दोन मोठ्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागेच असू असेही धनोआ म्हणाले.

सध्या हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई, तेजस, मिग, मिराज, सी १३० सारखे मालवाहू विमान आणि हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे.